लातूर : कोविडचा उद्रेक सुरू असताना वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेशपूर्व (नीट) परीक्षालातूर जिल्ह्यातील ४३ केंद्रांवर अत्यंत्य शिस्तबद्ध पद्धतीने रविवारी पार पडली. या परीक्षेला एकूण १६ हजार ८८८ विद्यार्थ्यांपैकी १५ हजार ६९४ विद्यार्थी सामोरे गेले. तर १ हजार १९४ विद्यार्थी गैरहजर राहिले.
परीक्षेची वेळ दुपारी २ ते ५ असली तरी परीक्षार्थ्यांना केंद्रावर सकाळी ११ वाजताच येण्याचे निर्बंध होते. त्यानुसार लातूर शहरातील केंद्रावर विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. सकाळी ११ ते १.३० या वेळेत सर्व परीक्षार्थ्यांची नोंदणी करून आॅक्सिमीटरने तपासणी करण्यात आली. त्यानंतर परीक्षा हॉलमध्ये प्रवेश देण्यात आला. तत्पूर्वी केंद्र परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. परीक्षा हॉलमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये ६ फुटांचे अंतर ठेवण्यात आले होते.त्यानुसार डेस्कची रचना करण्यात आली होती. शिवाय, परीक्षार्थ्यांना परीक्षा व्यवस्थापनाकडून मास्क पुरविण्यात आले होते. परीक्षा हॉलमध्ये प्रवेश देतानाही एका विद्यार्थ्यामध्ये ६ फुटांचे अंतर ठेवण्यात आले होते.