- गोविंद इंगळेनिलंगा : येथील भूमी अभिलेख कार्यालयात बुधवारी १९ पैकी १६ कर्मचारी गैरहजर असल्याने ग्रामीण भागातून कामासाठी आलेल्या नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे पावणेदहा वाजता कार्यालय सुरू होणे आवश्यक असताना अकरा वाजता कार्यालयातील कामकाज सुरू करण्यात आले. परिणामी, कामासाठी आलेल्या नागरिकांनी संताप व्यक्त केला. निलंगा येथे भूमी अभिलेख कार्यालय असून, येथील उपअधीक्षक पद रिक्त असल्याने कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे मोजणीची प्रलंबित कामे ठप्प आहेत.
मुख्यालय सहायक या पदावरील कर्मचारी कायम लातूर येथे बैठकीसाठी किंवा दौऱ्यावर असतात. तसेच नियमतनदार, भूमापक, दुरुस्ती लिपिक हेही कायम दौऱ्यावर आहेत, असे सांगितले जाते. कनिष्ठ लिपिक, नगर भूमापन लिपिक व दफ्तरबंद कर्मचारी यांची पदे रिक्त आहेत. कार्यालयातील पर्यवेक्षक भूमापक हे अनेक दिवसांपासून रजेवर आहेत. तर पाच शिपाई पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एक मेडिकल रजेवर, दुसरा डेप्यूटेशनवर लातूर येथे वरिष्ठ कार्यालयात, तर दोन शिपाई दौऱ्यावर असल्याचे सांगण्यात आले. तर आज, बुधवारी छाननी लिपिक, औराद शहाजानी विभागाचे लिपिक, एक शिपाई उपस्थित होते.
तर भूमापक, अभिलेखपाल, प्रतिलिपी लिपिक हे तिघेजण प्रशिक्षण शिबिर करून आजच कामावर रुजू झाल्याचे सांगण्यात आले. एकूणच अधिकाऱ्यांसह १९ कर्मचारी असलेल्या या कार्यालयात केवळ तीन कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले. दरम्यान, निलंगा पंचायत समिती कार्यालयात भाजपचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी अचानक भेट दिली. यावेळी दोन कर्मचाऱ्यांनी हजेरी रजिस्टरवर एक दिवस आधीच पुढच्या स्वाक्षऱ्या केल्याचे दिसून आले.
कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी...औसा येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक हेमंत निगडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, माझ्याकडे औसा कार्यालयाचा कार्यभार असून, निलंगा येथील प्रभारी कामकाज आहे. यासाठी मंगळवारी व गुरुवारी निलंगा कार्यालयात असतो. मात्र, गुरुवार असूनही लातूर येथील बैठकीमुळे येऊ शकलो नाही. तसेच निलंगा कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. काही पदे रिक्त असून, काही जण रजेवर आहेत.