लातूर : जिल्ह्यात शुक्रवारी व शनिवारी दोन दिवस वीजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यात रबी हंगामातील पिके, फळबागा, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, महसूल प्रशासनाकडून रविवारपासून पंचनामे करण्यात येत आहेत. दरम्यान, दोन दिवसांत जिल्ह्यात १७.२ मि.मी. पाऊस झाला. या पावसात वीज पडल्याने सहा पशूधन दगावले आहेत.जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊसाने गारपीटीसह हजेरी लावली. या पावसाने रबी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, करडई पिकांसह आंबे, द्राक्ष आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी रेणापूर, चाकूर येथे प्रत्यक्ष शेतात नुकसानीची पाहणी केली. शिवाय, आढावा बैठकीत तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुषंगाने रविवारपासून महसूल प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. कर्मचारी संपावर असले तरी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पुढे आले आहेत. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत १७.२ मि.मी. पाऊस झाला आहे. यात लातूर तालुक्यात १० मि.मी., औसा १३.८, अहमदपूर ७.७, निलंगा १७.७, उदगीर २९.२, चाकूर १८.५, रेणापूर ९.५, देवणी ४८.२, शिरुर अनंतपाळ १२ व जळकोट तालुक्यात २२.८ मि.मी. पाऊस झाला आहे.
वीज पडून सहा जनावरे दगावली...
जिल्ह्यात शुक्रवारी निलंगा तालुक्यातील तांबाळवाडी येथील दयानंद बिराजदार यांची गाय, सावरीचे ऋषिकेश कदम पाटील यांची म्हैस, चाकूर तालुक्यातील जानवळ येथील बाबु राठोड यांची म्हैस, उदगीर तालुक्यातील कौलखेड येथील सुधाकर नाईक यांचे हलगट तसेच शनिवारी रात्री चाकूर तालुक्यातील बावलगाव येथे एक गाय आणि उदगीर तालुक्यातील नागलगाव येथील शेतकरी अर्जुन रेड्डी गुंडरे यांची म्हैस वीज पडून दगावली आहे.