औसा (जि.लातूर) : आषाढी एकादशी निमित्त नांदेड जिल्ह्यातून पायी दिंडीत पंढरपूरला गेलेल्या भाविकांच्या टेम्पो व बसचा औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील नागरसोगा मोडजवळील पुलावर गुरूवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. यात टेम्पो चालकासह १८ भाविक जखमी झाले. तर यातील दोघे गंभीर असून सर्व जखमीवर औसा व लातूर येथे उपचार करण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातून श्री.संत.ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी आळंदी, पंढरपूरला पायी दिंडी गेली होती. आषाढी एकादशीला विठ्ठलाचे दर्शन करुन गावी परताणाऱ्या टेम्पो क्रमांक एमएच २६ बी ई ००३४ व यवतमाळ विभागाच्या पंढरपूर ते दारवानेर एसटी क्रमांक एमएच ४० ए क्यू ६३२६ ची धडक औसा शहरा जवळील पुलावर झाली. यात टेम्पो बसच्या पाठीमागील बाजूला जावून आदळल्याचे पोलिसांनी सांगितले.
अपघातात हे भाविक झाले जखमी...
टेम्पोतील बालाजी बाबळे (४५), कांताबाई बाबळे (५०), गंगाबाई सुर्यवंशी (५५), विनताबाई फुलारी (६०), बंडू फुलारी (६५), मिराबाई जाधव (४०), बालाजी जाधव (५०), गंगाबाई हार्डकर (४६), नथुराम बोरलेवाड (६५), विमलबाई बोरलेवाड (वय ६० सर्व रा. बाणेगाव ता. हदगाव), मारुती पुसांडे (५६), संदीप नेवरकर (३५), भोजन्ना भरडेवार (वय ५५ रा. देवशी ता.भोकर), वंदना पुसांडे (४९), पुणेरताबाई पाटे, सविता जाधव, मिना पाटील, चालक भास्कर शिंदे (वय २७,) हे अपघातात जखमी झाले आहेत.
जेसीबीच्या साह्याने टेम्पो काढला...
यावतमाळ विभागाच्या दारवा नेर आगाराची बस यात्रेनिमित्त भाविक घेवून पंढरपूरला गेली होती. सकाळी पंढरपूर ते दारवा नेरकडे जाताना बसमध्ये ४३ प्रवाशी बसले होती. औशाजवळील पुलावर बस पुढे जात असताना पाठीमागून टेम्पो बसच्या पाठीमागून घुसली. घटनास्थळी नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. टेम्पोचा काही भाग बसच्या पाठीमागे अडकल्याने जेसीबीच्या साह्याने बाहेर काढण्यात आले.