लातूर : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहन अनुदान देण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यात १ लाख ८४ हजार ५५६ पात्र शेतकरी असून, आतापर्यंत दुसऱ्या टप्प्यात १ लाख ३१ हजार २४४ जणांची यादी जाहीर झाली आहे. पैकी ५३ हजार २३४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १८२ कोटी ५१ लाखांचे प्रोत्साहन अनुदान वर्ग करण्यात आले आहे.
२०१८-१९, २०१९-२०, २०२०-२१ या तीन वर्षांमध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून प्रोत्साहन अनुदान देण्यात येत आहे. जिल्ह्यात १ लाख ८४ हजार ५५६ लाभार्थ्यांची यादी उपनिबंधक कार्यालयाकडून शासनाकडे पाठविण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या यादी ४८ हजार शेतकऱ्यांची नावे आली होती. त्यापैकी ४५ हजार शेतकऱ्यांना १५२ कोटींचे वितरण झाले होते. आता दुसऱ्या यादीत ८३ हजार शेतकऱ्यांची नावे आली असून, ही संख्या १ लाख ३१ हजार २४४ वर पोहचली आहे. यापैकी १ लाख २५ हजार ५९१ शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली असून, त्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ५३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर १८२ कोटी ५१ लाख रुपयांचे अनुदान शासनाकडून वर्ग करण्यात आले आहे. दरम्यान, ही सर्व प्रक्रिया विशिष्ट क्रमांकावरच चालते. यादीमध्ये नाव आल्यानंतर शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक दिला जातो. संबंधित बँकेत जाऊन शेतकऱ्यांना ई-केवायसी केल्यावर प्रोत्साहनसाठी मिळणारी रक्कम सांगितली जाते. ती मंजूर असल्यासच शेतकरी प्रोत्साहनसाठी सहमत असल्याचे कळवितात. त्यानंतर काही दिवसांतच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते.
तिसरी यादी केव्हा जाहीर होणार?गेल्या चार महिन्यांपासून प्रोत्साहन अनुदानाची प्रक्रिया राबविली जात आहे. पहिल्या यादीत ४८ हजार, दुसऱ्या यादीत ८३ हजार शेतकऱ्यांची नावे आली आहेत. तर अद्यापही ५३ हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, तिसऱ्या यादीत या शेतकऱ्यांना नाव येण्याची प्रतीक्षा असली तरी तिसरी यादी कधी जाहीर होणार असा प्रश्न लाभार्थ्यांमधून विचारला जात आहे.
तहसीलस्तरावर १३८ तक्रारी दाखल...प्रोत्साहन अनुदानाबाबत शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम मंजूर नसल्यास त्याबाबत तहसीलस्तरावर तक्रार करण्याची मुभा आहे. त्यानुसार जिल्ह्यात तहसीलस्तरावर १३८ तक्रारी आल्या असून, १८७ तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत. तर डीएलसी स्तरावर २६८ तक्रारी रखडल्या असून, १०२ तक्रारी सोडविण्यात आले असल्याचे उपनिबंधक कार्यालयातून सांगण्यात आले.
ईकेवायसी करण्याचे प्रशासनाचे आवाहन...जिल्ह्यात प्रोत्साहन अनुदानासाठी १ लाख ८४ हजार ५५६ पात्र लाभार्थी आहेत. यातील १ लाख ३१ हजार २४४ जणांना विशिष्ट क्रमांक मिळाला असून, १ लाख २५ हजार ५९१ जणांची ई-केवायसी झालेली आहे. तर ५ हजार ६५३ शेतकऱ्यांनी अद्यापही ई-केवायसी केलेली नसल्याने ते अनुदानापासून वंचित आहे. त्यामुळे लवकरात लवकर ई-केवायसी करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक एस.आर. नाईकवाडी यांनी केले आहे.