लातूर: निवडणूक आयोगाने लोकसभेची निवडणूक शनिवारी दुपारी घोषित केली आहे. त्याची अंमलबजावणी लातूरलोकसभा मतदारसंघात सुरू झाली असून आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी विविध पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. लातूर राखीव मतदारसंघात एकुण १९ लाख ६९ हजार १७७ मतदार आपला हक्क बजावतील. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू आहे. मतदानासाठी २ हजार १२५ केंद्र असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी पत्रपरिषदेत शनिवारी दिली.
लातूर लोकसभा मतदारसंघात पाचव्या टप्यात मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या वेळापत्रकानुसार १२ एप्रिल रोजी अधिसूचना प्रसिध्द होईल. नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी १९ एप्रिल शेवटचा दिवस आहे. त्यानंतर २० रोजी छाननी होईल, २२ एप्रिल रोजी उमेदवारी माघार घेता येईल. ७ मे रोजी मतदान होणार आहे. तर ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतदारसंघात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाईल. निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडतील,यासाठी आमचा प्रयत्न आहे.
आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी. प्रशासन तत्पर असून आचारसंहितेचा भंग केल्यास तत्काळ कारवाई केली जाईल. शासकीय कर्मचाऱ्यांनी कुठल्याही पक्षाच्या प्रचारात सहभाग घेऊ नये, तसे आढळून आल्यास कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी सांगितले. पत्रपरिषदेस उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांची उपस्थिती होती.
...तर गुन्हे दाखल करणार - पोलीस अधीक्षकसामाजिक तेढ निर्माण करणे, मतदानासाठी मतदारांना आमिष दाखविणे गुन्हा आहे, असा प्रकार आढळून आल्यास नागरिकांनी आमच्याकडे तक्रार करावी. किंवा आमच्या पथकाला निदर्शनास आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. शिवाय, समाजमाध्यमांवरही विशेष लक्ष असून निवडणूक काळात विचारपूर्वक पोस्ट कराव्यात, असे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सांगितले.
लातूर शहरमध्ये सर्वाधिक मतदार...लातूर लोकसभा मतदारसंघात एकुण १९ लाख ६९ हजार १७७ मतदार आपला हक्क बजावतील. त्यात १० लाख २९ हजार ९६१ पुरूष तर ९ लाख ३५ हजार ७७५ महिला मतदार आहेत. शिवाय, तृतीयपंथी ६३ व ३ हजार ३६८ सैनिक मतदार आहेत. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ३ लाख ८१ हजार १९१ मतदार आहेत. लातूर ग्रामीण ३ लाख २२ हजार ५५८, अहमदपूर ३ लाख ३७ हजार १२९, उदगीर (राखीव) ३ लाख ११ हजार ४४, निलंगा ३ लाख २१ हजार २९२, लोहा विधानसभा मतदारसंघात २ लाख ९२ हजार ५८५ मतदार आहेत.