लातूर : आरोग्य विभागाच्यावतीने शून्य ते अठरा वर्षे वयोगटांतील बालकांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी जागरूक पालक-सुदृढ बालक अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत आतापर्यंत ० ते ६ वयोगटातील १ लाख ३७ हजार ९०० आणि ६ ते १८ वयोगटातील ३ लाख ५४ हजार ७७ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये १९ हजार ४९५ बालके विविध आजारांनी ग्रस्त असल्याचे आढळले असून, यातील ७१ जणांना शस्त्रक्रियेकरिता संदर्भित करण्यात आले आहे.
बालकांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी जागरूक पालक-सुदृढ बालक अभियान जिल्ह्यात ९ फेब्रुवारीपासून राबविण्यात येत आहे. शाळा, अंगणवाडीमधील एकूण ५ लाख ५८ हजार १८२ बालकांची तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये रक्तक्षय, दृष्टिदोष, त्वचा, दातासंबधी आजार, जीवनसत्त्वाची कमतरता, स्वमग्नता, जन्मजात हृदयरोग, कानासंबधी आजार, दुभंगलेले ओठासह कुपोषण आदी आजारांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., सीईओ अभिनव गोयल यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. हणमंत वडगावे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल.एस. देशमुख, जिल्हा माता व बाल संगोपण अधिकारी सतीष हरिदास यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेमुळे बालकांच्या आजाराचे लवकर निदान झाले असून, व्याधीग्रस्त बालकांना उपचार घेऊन लवकर बरे होण्यास मदत होणार आहे.
तालुकानिहाय असे आहेत आजार बालके...अहमदपूर तालुक्यात ३००९, औसा २७३८, चाकूर ८०८, देवणी १८८२, जळकोट ७३९, लातूर १९१३, निलंगा ३७५३, रेणापूर ९९६, शिरुर अनंतपाळ ८४८ तर उदगीर तालुक्यातील ३००९ बालके विविध आजारांनी ग्रस्त असल्याचे आढळून आले आहेत. दरम्यान, यातील ७१ बालकांना शस्त्रक्रियेकरिता ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय स्तरावर संदर्भित करण्यात आले आहे.
साडेपाच लाख बालकांची तपासणी...जागरूक पालक-सुदृढ बालक अभियानांतर्गत ५ लाख ५८ हजार १८२ बालकांची तपासणीचे उद्दीष्ट होते. त्यानुसार ० ते ६ वयोगटातील १ लाख ३७ हजार ९०० आणि ६ ते १८ वयोगटातील ३ लाख ५४ हजार ७७ लाभार्थींची तपासणी करण्यात आली आहे. ९ फेब्रुवारीपासून हे अभियान सुरू असून, ३४३४ अंगणवाड्या आणि २२५१ शाळांमध्ये हे अभियान राबविण्यात आले.
आजार आढळलेल्या बालकांवर औषधोपचार...शाळा, अंगणवाडीमध्ये जागरूक पालक-सुदृढ बालक अभियानांतर्गत आरोग्य तपासणी करण्यात आली. अभियानांतर्गत ज्या बालकांना शस्त्रक्रियेची गरज होती त्यांना संदर्भित करण्यात आले. तर इतरांवर औषधोपचार करण्यात आले. मोहीमेमुळे बालकांच्या आजाराचे निदान झाले असून, आजार लवकर बरा होण्यास मदत होणार आहे. अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा डाटाबेस तयार झाला आहे. - डॉ. हणमंत वडगावे, जिल्हा आरोग्याधिकारी
आजार आणि ग्रस्त बालकांची संख्या...आजार बाधित बालकेरक्तक्षय १५२२दृष्टिदोष २५९७त्वचेसंबधी आजार १२७१दातासंबधी आजार ४३५०जीवनसत्त्व कमतरता १७९९स्वमग्नता १८६जन्मत: हृदयरोग ९२दुभंगलेले ओठ २४कानाचे आजार ४२८कुपोषित ५३४