लातूर : निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्यास गळीत हंगाम २०२२-२३ साठीचा उत्कृष्ट तांत्रिक क्षमतेचा राज्यस्तरावरील प्रथम पुरस्कार पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे प्रदान करण्यात आला.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. हा पुरस्कार कारखान्याच्या वतीने विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हा. चेअरमन रवींद्र काळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई, संचालक गोविंद बोराडे, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, गुरुनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, रणजित पाटील, गोविंद डुरे, अमृत जाधव, भारत आदमाने, रामदास राऊत, सुभाष माने, संजय पाटील खंडापूरकर यांनी स्वीकारला.
भैरवनाथ सवासे यांना प्रथम पारितोषिक...विलास सहकारी साखर कारखान्याचे लातूर तालुक्यातील कासारजवळा गावातील सभासद व कारखान्याचे संचालक भैरवनाथ रघुनाथ सवासे यांना खोडवा हंगामासाठी को. ८६०३२ वाणाचे हेक्टरी २१५ मे. टन उसाचे उत्पादन घेतल्याबद्दल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने खोडवा हंगामातील सर्वाधिक हेक्टरी ऊस उत्पादनाचे प्रथम पारितोषिक प्रदान केले.
साखर उद्याेगात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ...कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विलास सहकारी साखर कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे. कारखान्याने उभारणीपासून ऊसलागवड ते ऊसतोडणी, वाहतूक तसेच कारखानाअंतर्गत अद्ययावत तंत्रज्ञानाला प्राधान्य देण्यात आले आहे. पहिल्या गळीत हंगामापासून केलेल्या कामगिरीसाठी कारखान्यास २५ वर्षांत ३४ पारितोषिके मिळाली आहेत.