अहमदपूर : तालुक्यातील २८ लघु, मध्यम प्रकल्प व साठवण तलावात सरासरी २० टक्के जलसाठा असून, सहा प्रकल्पांत अद्यापही पाणीसाठा शून्य टक्क्यांवरच आहे. प्रकल्पात चांगला पाणीसाठा होण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा असून, सध्या भिज पाऊस सुरू असला तरी रब्बीसाठी तालुक्यातील प्रकल्प भरणे गरजेचे आहे. मागील वर्षी याच काळात २५ टक्के जलसाठा होता. मागील वर्षीच्या तुलनेत सद्यस्थितीत केवळ २० टक्के जलसाठा आहे.
अहमदपूर तालुक्यात २८ लघु, मध्यम व साठवण तलाव असून ते दोन विभागात विभागले आहेत. लातूर पाटबंधारे विभाग अंतर्गत दोन उपविभाग असून क्रमांक ९ अंतर्गत व्हटी, कोपरा, भुतेकरवाडी, उगिलेवाडी, नागठाणा, पाटोदा, गौताळा, काळेगाव, अहमदपूर, तेलगाव, वडगाव या ११ प्रकल्पांत सरासरी १२ टक्के जलसाठा आहे. तर पाटबंधारे उपविभाग क्रमांक १० अंतर्गत १७ प्रकल्पात मोघा, थोडगा, सावरगाव, तांबट सांगवी, मावलगाव, खंडाळी, गुगदळ, नागझरी, सोनखेड, धसवाडी, अंधोरी, ढाळेगाव, मोळवण, कावळवाडी, हंगेवाडी, येलदरी यांचा समावेश आहे. यामध्ये २५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. दोन्ही जलसाठ्यांची सरासरीनुसार तालुक्यातील प्रकल्पात २० टक्के जलसाठा आहे. सध्या भिज पाऊस चालू असून अनेक ठिकाणी जुलैची सरासरी ही पावसाने ओलांडली आहे. मात्र, प्रकल्प भरण्यासाठी परतीच्या पावसाची वाट पहावी लागणार असून, मोठा पाऊस पडला तरच रब्बीसाठी आवश्यक असणारा पाणीसाठा होणार असून त्यावरच अहमदपूर तालुक्याचे रब्बीचे क्षेत्र अवलंबून आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाणीसाठा...
दरवर्षी जुलैमध्ये २० ते २५ टक्के प्रकल्प भरलेले असतात. मात्र, ऑक्टोबर. नोव्हेंबरमध्ये परतीच्या पावसाने सर्वच प्रकल्प भरतात. मागील वर्षी ९० टक्के प्रकल्प भरले होते. त्यामुळे तालुक्यातील रब्बीचे क्षेत्र वाढले होते, असे लातूर पाटबंधारे या विभागाचे उपअभियंता ओमप्रकाश थोरमाेटे यांनी सांगितले.
भिज पावसाने शेतकरी आनंदित...
अहमदपूर तालुक्यात सर्वदूर पाऊस झाला असून, सर्वच मंडळात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकरी आनंदात आहेत. अहमदपूर मंडळात आतापर्यंत ४१०, किनगाव ३४४, अंधोरी ४१७, खंडाळी ५१६, शिरुर ताजबंद ५५३, हाडोळती ४३४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. दरम्यान, भिज पावसामुळे खरिपातील पिके बहरली असून, तालुक्यातील प्रकल्प भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.