उदगीर: सहा वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास आणि २५ हजार रु. दंड अशी शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ पी.डी. सुभेदार यांनी ठोठावली. अब्दुल मुखीद जैनोलाबेद्दीन शेख असे आरोपीचे नाव आहे. दंडाची रक्कम भरली नाही तर आणखी एक वर्ष कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली.
पिडीत सहा वर्षाची मुलगी व आरोपी अब्दुल मुखीद जैनोलाबेद्दीन शेख हे एकाच परिसरात रहात होते. आरोपी हा पिडीत मुलीला खेळण्यासाठी मोबाईल देत असे. घटने दिवशी खेळण्यासाठी मोबाईल देत आरोपीने पिडीत मुलीवर अत्याचार केला. त्रास होत असल्याने पिडीत बालीकेने घरी आल्यानंतर याची माहिती आईस दिली. त्यानंतनर पिडीतेच्या आईने उदगीर ग्रा. पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. त्या तक्रारीवरुन आरोपीविरुध्द कलम ३७६ (अब), ३५४ भादवि तसेच कलम ४, ६, ८,१०, १२ बा.लै.अ.प्र.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले यांनी तपास करून आरोपीविरुध्द दोषारोपपत्र उदगीरच्या न्यायालयात दाखल केले.
दरम्यान, उदगीर येथील अति रिक्त जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकार पक्षाच्यावतीने एकूण साक्षिदारांची साक्ष नोंदविण्यात येऊन पुरावे सादर करण्यात आले. सहायक सरकारी वकील शिवकुमार गिरवलकर यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. डी. सुभेदार यांनी आरोपी अब्दुल मुखीद जैनोलाबेद्दीन शेख यास २० वर्षे सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. याप्रकरणी कोर्ट पैरवी अधिकारी अक्रम शेख यांनी सहकार्य केले.