आशपाक पठाण, लातूर: यंदा पाऊस उशिरा आला, आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस पडताच खरिपाची पेरणी केली. जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र सोयाबीनचे असल्याने बाजारात विविध कंपन्यांची बियाणे विक्रीसाठी येतात. त्यात शेतकऱ्यांच्या मनात महाबीजची विश्वासार्हता अधिक असल्याने मोठ्या प्रमाणात पेरा झाला. मात्र, विश्वासाच्या कंपनीने दगा दिल्याने लातूर जिल्ह्यात २०२ शेतकऱ्यांनी महाबीज विराेधात कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत.
उशिरा झालेल्या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाणाची उगवण क्षमताही तपासून पाहिली नाही. विश्सासाने पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसल्याने जिल्ह्यातील दोनशे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. औसा, निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सर्वाधिक तक्रारी असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. कुणाच्या एक, कुणाच्या दोन कुणाच्या तीन बॅगा उगवल्या नसल्याच्या तक्रारी आहेत. यातून शेकडो हेक्टर्समध्ये शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचा खर्च मातीत गेला आहे.
एकरी १५ हजारांचा खर्च...
खरीपात सोयाबीन पेरणीसाठी एकरी किमान १२ ते १५ हजार रूपये खर्च येतो. शिवाय, उशिरा पेरणी झाल्यावर उत्पादनात घट होते. महाबीज कंपनीचे बियाणे अनेक भागात उगवले नसल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप झाला आहे. त्याचबरोबर दुबार पेरणीमुळे आर्थिक फटका बसला आहे. कंपनीने तक्रारदार शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रूपये भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल यांनी केली आहे.
तक्रार देऊन आठ दिवस झाले....
औसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार देऊन आठ दिवस लोटले तरी अद्यापही पंचनामे करण्यात आले नाहीत, असे तपसे चिंचोली, जवळगा पोमादेवी, दापेगाव, लामजना, गाडवेवाडी, भादा आदी गावातील शेतकरी रजनीकांत लोहारे,बबन स्वामी, शिवराज वडगावे, पंडित लोहारे, त्र्यंबक सुरवसे, शिवशंकर तुगावे, अंकुश पळसे, सिताराम यादव यांनी सांगितले.
कृषी विभागाकडून पंचनामे सुरू...
शेतकऱ्यांनी तक्रार दिल्यावर लागलीच पंचनामे केले जात आहे. यासाठी तालुकास्तरावर तक्रार निवारण समिती आहे. पंचनामा झाल्यावर शेतकऱ्यांना ग्राहक मंचात दावा दाखल करता येतो. तालुका कृषी विभागाकडून आलेले अहवाल एकत्रित करून आम्ही महाबीज कंपनीच्या अकोला येथील कार्यालयाकडे पाठविणार आहोत. बियाणे कोणत्या कारणाने उगवले नाही, हे पंचनाम्यानंतर स्पष्ट होते. जिल्ह्यातून २०२ शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या आहेत. यात औसा, निलंग्यातील शेतकरी जास्त आहेत. -रक्षा शिंदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी.