लातूर : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायद्याचे (कोटपा) उल्लंघन करणाऱ्या २२ जणांविर औसा येथे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई लातूर जिल्हा तंबाखू नियंत्रणासाठी अंमलबजावणी पथकाने केली. यामध्ये एकूण ५ हजार २५० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनमंत वडगावे, औसा येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अंगद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाच्या पथकाने केली.
औसा येथील बसस्थानक, हनुमान चौक, छत्रपती शिवाजी महाराज चाैक परिसरातील अवैधरित्या तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, जाहिरात करणारे पानटपरीधारक, तहसील कार्यालय आणि परिसरात सार्वजनिक ठिकाणी पान, सुपारी, गुटखा खाणे, त्याचबराेबर थुंकणाऱ्या २२ जणांवर पथकाच्या वतीने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायद्यान्वये (कोटपा) कारवाई करण्यात आली आहे. पथकात औसा येथील ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.यू. पटवारी, पडिले, गवळी डॉ. माधुरी उटीकर, प्रकाश बेंबरे, संध्या शेडोळे, अभिजित संगई यांचा समावेश होता.