देवणी : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात बाला उपक्रम राबविण्यात येत आहे. तालुक्यातील एकूण ६५ पैकी पहिल्या टप्प्यात ३५ शाळा या उपक्रमात सहभागी झाल्या असून शाळांच्या विकासासाठी गावकऱ्यांनी २३ लाखांचा लोकसहभाग जमा केला आहे.
जिल्हा परिषद शाळांच्या विकासासाठी सीईओ अभिनव गोयल यांनी बाला उपक्रम सुरू केला आहे. २९ मुद्यांवर आधारित हा उपक्रम आहे. ग्रामपंचायत, शिक्षक, गावकऱ्यांच्या लोकसहभागातून शाळेतील प्रत्येक वर्गाच्या भिंती बोलक्या करण्यात येत आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करण्यात येत आहे.
पहिल्या टप्प्यात ३५ शाळांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. दरम्यान, या उपक्रमाचे यश पाहून तालुक्यातील अन्य शाळाही त्यात सहभागी झाल्या आहेत. त्यासाठी ग्रामपंचायत निधीबरोबर सभापती सविता पाटील, उपसभापती शंकर पाटील, गटविकास अधिकारी मनोज राऊत, गटशिक्षणाधिकारी व्यंकट बोईनवाड, विस्तार अधिकारी सुधाकर येडले, केंद्रप्रमुख सदाशिव साबणे, पी. टी. येलमटे, जी. टी. गायकवाड, चव्हाण, नरवटे, अजिज तांबोळी यांनी मदत केली.
शिक्षकांकडून १४ लाखांची मदत...
तालुक्यातील शिक्षकांनी आतापर्यंत १४ लाख २६ हजारांचा सहभाग शाळांसाठी दिला आहे. तसेच गावातील पालक, प्रतिष्ठित नागरिक व शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनीही आतापर्यंत एकूण ८ लाख ७२ हजार १५७ रुपयांचा लोकसहभाग दिला आहे. त्यामुळे तालुक्यातील ३५ शाळांसाठी एकूण २२ लाख ९८ हजार १५७ रुपयांचा लोकसहभाग जमा झाला आहे.
गावातील शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यी, पालकांनी अधिकाधिक मदत करावी. शाळेसाठी आवश्यक ते शैक्षणिक साहित्य अथवा रोख रकमेच्या माध्यमातून मदत करावी. त्यासाठी मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी केले आहे. दरम्यान, माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी बाला उपक्रमासाठी जमलेल्या लोकसहभागाच्या २५ टक्के रक्कम आमदार निधीतून शाळांसाठी देण्यात येईल, अशी घोषणा केली. त्यामुळे तालुक्यात या उपक्रमास गती मिळाली आहे.