औसा (जि. लातूर) : तालुक्यातील फत्तेपूर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यांने चावा घेतल्याने २५ जनावरे दगावली आहेत. गावाला पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने भेट दिली असून, लसीकरण माेहीम राबविण्यात आली आहे.
फत्तेपूर गावात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने, त्यातून झालेल्या संसर्गामुळे माेठे १८ आणि इतर आजारांनी ७ अशी एकूण २५ जनावरे दगावली. परिणामी, पशुपालकांमध्ये कमालीची चिंता आहे. यशवंतनगर येथे चार वर्षांपूर्वी केलेल्या पशुधन गणनेनुसार गायींची संख्या ४७१, म्हैस १७१, शेळ्या १३५ पशूची नोंद आहे. पशुधनामध्ये चारा खाणे बंद, जिभेला काटे येणे, कान-डोळे तटारणे, पुढच्या पायाने माती उकरणे, एकटक बघणे, ताप येणे, मारण्यासाठी अंगावर येणे, जाग्यावरच काेसळणे आदीं लक्षणे दिसून आली. त्यात दुधाळ पशुधन गाय, म्हैस आणि वासरांचे प्रमाण अधिक आहे. यामुळे १८ तर ताप आणि इतर आजारांमुळे सात पशुधन दगावले.
यामध्ये पवन साळुंके, श्रीरंग जोगी, विजयकुमार यादव, प्रकाश धानुरे, रमेश कांबळे, खंडू अडसुळे, रतन चांदूरे, माधव मुगळे, शिवशाम माळी, विलास धानुरे, उत्तम धानुरे, लक्ष्मीबाई साळुंके, नामदेव माळी, शामराव पाटील, बालाजी चांदुरे, कडाजी राऊत, महेबूब शेख, बालाजी साळुंके, इमाम शेख आदीं पशुपालकांच्या पशुधनांचा दगावलेल्यांमध्ये समावेश आहे.
लसीकरणानंतरही पशुधन दगावले...
रेबिजसह दंत, थंडी आणि गोचिडांच्या प्रादुर्भावामुळे २५ जनावरे दगावली आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने गावात भेट देऊन पाहणी केली आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने या पशुधनांना चावा घेतल्याने ही घटना घडली आहे. २८ नोव्हेंबरला बैठक घेत याची माहिती पशुपालकांना देण्यात आली. २९ नोव्हेंबरला लसीकरण केल्याचे पर्यवेक्षक किशोर जाधव म्हणाले.
कुत्र्याने चावा घेतल्यानेच मृत्यू...
पिसाळलेल्या कुत्र्याने २५ पैकी काही पशुधनांना चावा घेतला असून, ती दगावली आहेत तर काही इतर आजारांमुळे दगावली आहेत. या गावाला आमच्या पथकाने भेट दिली आहे. पशुपालकांनाही काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
- डाॅ. राजकुमार पडिले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, लातूर