लातूर : येथील अतिरिक्त एमआयडीसी परिसरात असलेल्या एका गाेदामात ठेवण्यात आलेले साहित्य, मालापैकी तब्बल २५ लाख २२ हजारांचा मुद्देमाल पस्पर चाेरी केल्याची घटना समाेर आली आहे. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात अहमदनगर जिल्ह्यातील एकाविराेधात साेमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले की, फिर्यादी संदीप रामचंद्र पाटील (वय ३८ रा. इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. काेल्हापूर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, लातुरातील अतिरिक्त एमआयडीसी परिसरात बंगळुरू येथील एका कंपनीचे गाेदाम असून, येथे तुषार राजू शिंदे (रा. श्रीगाेंदा, जि. अहमदनगर) हा व्यवस्थापक म्हणून कामावर हाेता. दरम्यान, त्याने आणि त्याच्यासाेबत असलेल्या एकाने संगनमत करून गाेदामात ठेवण्यात आलेल्या ४० लाखांच्या साहित्यापैकी तब्बल २५ लाख २२ हजारांच्या साहित्याची चाेरी स्वत:च्या फायद्यासाठी केली आहे.
यामध्ये कच्च्या मालापैकी ९९ राेल (किंमत २३ लाख ५० हजार रुपये) आणि ३६ बॅगचा (किंमत १ लाख ७२ हजार) समावेश आहे. याबाबत फिर्यादीने पैशाची मागणी केली असता, तुझे कशाचे पैसे? यानंतर जर पैसे मागितलास तर तुला जिवंत साेडणार नाही, अशी जिवे मारण्याची धमकी दिली. ही चाेरी ३० सप्टेंबर ते ५ नाेव्हेंबर या कालावधीत घडली आहे. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून तुषार राजू शिंदे याच्यासह अन्य एकाविराेधात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास एमआयडीसी पाेलिस करत आहेत.