लातूर : जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर २५ टक्के अग्रीम पीकविमा जमा करावा, अशी मागणी करीत गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. तसेच पीकविमा कार्यालयाच्या फलकास काळे फासून संताप व्यक्त केला.
मनसेचे सरचिटणीस संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाने, जिल्हाध्यक्ष संजय राठोड, जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे, महिला प्रदेश उपाध्यक्षा रेखाताई नागराळे, सचिन सिरसाट, वाहिद शेख, किरण चव्हाण, महेश माने, अजय कलशेट्टी, मनोज अभंगे, बाळासाहेब मुंडे, सोमनाथ कलशेट्टी, महेश देशमुख, संग्राम रोडगे, वंदनाताई केंद्रे, रवि सूर्यवंशी, बजरंग ठाकूर, वैभव जाधव, परमेश्वर पवार, जहाँगीर शेख, अनिल पांढरे, पप्पू आकनगिरे, रवी पांचाळ, भागवत कांदे, नरेश कांदे, शिवराज सिरसाट, भागवत मुंडे, अनिल सुरवसे आदी उपस्थित होते.
जोरदार घोषणाबाजी करत पीकविमा कार्यालयाच्या फलकास काळे फासण्यात आले.यंदा जिल्ह्यात पावसाने ताण दिला. खरीप हंगामातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला. उत्पादनात ६० ते ७० टक्के घट होण्याची शक्यता असल्याच्या अहवालावरुन जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळातील पीकविमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम पीकविमा देण्यासंदर्भात अधिसूचना काढली.
ही अधिसूचना काढून दोन महिने उलटले तरी अद्यापही अग्रीम देण्यात आला नाही. दरम्यान, पीकविमा कंपनीने जिल्ह्यातील केवळ दहा महसूल मंडळांत २१ दिवसांचा पावसाचा खंड होता. त्यामुळे त्या मंडळात २५ टक्के अग्रीम दिला जाऊ शकतो, अशी भूमिका घेतली होती. तेव्हा मनसे शेतकरी संघटना व प्रशासनाने कडक भूमिका घेतली. तेव्हा पीकविमा कंपनी विविध कारणे सांगण्यास सुरुवात केली.पीकविमा कंपनीने अपिलावर अपिल न करता तत्काळ साठही महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रीम जमा करावी, या मागणीसाठी मनसेच्या वतीने पीकविमा कंपनीच्या जिल्हा कार्यालयासमोर जोरदार घोषणा देत निदर्शने करण्यात आली. तसेच कंपनीच्या फलकास व बंद शटरला काळे लावण्यात आले.