लातूर : जिल्ह्यात दहापैकी सहा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, ६० पैकी ३० महसूल मंडळात पावसाने हाहाकार केला आहे. यामुळे ओढ्या-नाल्यांना पुर आला असून, शेतशिवारांनी पाणीच पाणी झाले आहे. दरम्यान, धनेगाव येथील मांजरा दरवाज्याचे एकूण १८ दरवाजे उघडल्याने मांजरा नदीत ७० हजार ८४५.३० क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. पहिले सहा दरवाजे ३ मीटरने उघडण्यात आले असून, ०.५ मीटरने उर्वरित बारा दरवाज्यातून विसर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, मांजरा नदीपात्रात व काठावर अडकलेल्या ४० जणांपैकी २५ जणांची सुटका आपत्ती व्यवस्थापनच्या टीमने केली असून, आणखीन १७ जणांचे बचावकार्य सुरु आहे.
लातूर जिल्ह्यात गेल्या २४ तासामध्ये ६६.०९ मि.मी. पाऊस झाला असून, लातूर, उदगीर, अहमदपूर, चाकूर, जळकोट आणि औसा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. वादळी, वा-यासह मेघगर्जनेत झालेल्या पावसामुळे नदी-नाल्यांना पुर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. रेणापूर तालुक्यातील डिगोळ देशमुख येथे दोन शेतकरी शेतात अडकले असून, या शेतक-यांना सुखरुप आणण्यासाठी एनडीआरएफची टिम शिवारात पोहचली आहे. तालुक्यातील घनसरगाव येथेही पाटबंधारे विभागाचे दोन कर्मचारी अडकले आहे. त्यांना आणण्यासाठीही एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. अहमदपूर तालुक्यातील किनगाव, अंधोरी भागात मुसळधार पाऊस झाला. बाभळगाव, कासारखेडा, मुरुड, गातेगाव, तांदूळजा, चिंचोली, औसा, लामजना, मातोळा, भादा, बेलकूंड, उजनी, अहमदपूर, खंडाळी, किनगाव, अंधोरी, शिरुर ताजबंद, हडोळती, उदगीर, वाढवणा, हेर, तोंडार, चाकूर, शेळगाव, रेणापूर, पोहरेगाव, पळशी, साकोळ, जळकोट, घोणसी या महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. ६५ मि.मी.च्या पुढे या महसूल मंडळामध्ये पाऊस झाला आहे.
गुलाब चक्रीवादळाचा फटका, औरंगाबादेत अनेक भागांतील घरांत घुसले पाणी, झाडे उन्मळून पडली
तांदूळजा आणि मुरुड महसूल मंडळात १२७ मि.मी. पाऊस...लातूर तालुक्यातील तांदूळजा आणि मुरुड महसूल मंडळात सर्वाधिक १२७.८ मि.मी. पाऊस झाला आहे. ही दोन्ही महसूल मंडळे जवळच असल्याने मुरुड ते तांदूळजा परिसरात पाणीच पाणी झाले आहे. तोंडार आणि चाकूर महसूल मंडळातही प्रत्येकी १०३ आणि १०१.३ मि.मी. पाऊस झाला. ९० मि.मी.च्या पुढे पोहरेगाव, रेणापूर, शिरुर ताजबंद, वाढवणा, मुरुड, तांदुळजा महसूल मंडळात पाऊस झाला आहे.गेल्या २४ तासात ६६.०९ मि.मी. पाऊस.जिल्ह्यात गेल्या २४ तासामध्ये ६६.९ मि.मी. पाऊस झाला आहे. आतापर्यंत ७५९ मि.मी. पाऊस झाला असून, वार्षिक सरासरीच्या १०९ टक्के झाला आहे. गेल्या २४ तासात लातूर तालुक्यात ८२, उदगीर ६७, अहमदपूर ८३, चाकूर ७२, जळकोट ७५, औसा ६४, रेणापूर ६३, निलंगा ४८, देवणी ४६ आणि शिरुर अनंतपाळ तालुक्यात ५७.९ मि.मी. पाऊस झाला आहे. सरासरी जिल्ह्यात अतिवृष्टीच आहे. हवामान खात्याने वारंवार अतिवृष्टीचे संकेत देऊन जनजागृती केली. त्यामुळे नागरिक सतर्क राहिले. आणखीन पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
पोहरेगावला हेलिकॉप्टरद्वारे बचाकार्य...मांजरा नदीवरील सारसा येथील नदीकाठावर ४० जण अडकले असून, यातील २५ जणांची सुटका करण्यात आली असून, उर्वरित १५ जणांची सुटका करण्यासाठी टीम कार्यरत झाली आहे. डिगाेळ देशमुख येथे नदीपात्राजवळ अडकलेल्या तिघांची सुटका करण्यात आली आहे. घनसरगाव बॅरेजवर पाटबंधारे विभागाचे तीन कर्मचारी अडकले आहेत. त्यांची सुटका करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची टीम परिश्रम घेत आहे. दरम्यान, एनडीआरएफचे पुण्याहून पथक जिल्ह्यात दाखल झाले असून, या पथकाने उदगीर तालुक्यात तळ ठोकला असून, पोहरेगाव येथील ४ जण मांजरा नदीपात्रात अडकले आहेत. त्यांना काढण्यासाठी हेलिकॉप्टरला पाचारण करण्यात आले असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी सांगितले.
मुसळधार पावसाने हाहाकार; अंबाजोगाईसह अनेक गावांचा संपर्क तुटला