लातूर : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षालातूर जिल्ह्यातील ५६ केंद्रावर रविवारी दुपारी २ ते ५ या वेळेत पार पडली. परीक्षेसाठी २५ हजार ८०७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी २५ हजार ६७५ विद्यार्थी उपस्थित तर १३२ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते.
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी नीट परीक्षा महत्वाची समजली जाते. त्यामुळे या परीक्षेची तयारी करण्यासाठी राज्यभरातील विद्यार्थी लातूरात येतात. त्यानुसार यंदा या परीक्षेसाठी २५ हजार ८०७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. रविवारी प्रत्यक्ष परीक्षेला २५ हजार ६७५ विद्यार्थी उपस्थित होते.
तर १३२ विद्यार्थी अनुपस्थित होते. मागील वर्षीप्रमाणे यंदाही लातूर तालुक्यातील बाभळगाव, पेठ, गंगापूर तर औसा तालुक्यातील आलमला, हासेगावसह अहमदपूर आणि उदगीर येथील केेंद्रावरही परीक्षा झाली. सकाळी ११ वाजेपासूनच पालक, विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर मोठी गर्दी केली होती. सकाळी ११ ते दुपारी १:३० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश देण्यात आले. नॅशनल टेस्टींग एजन्सीने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार विद्यार्थी ड्रेसकोडमध्ये आले आहे. दरम्यान, नीटसाठी जिल्ह्यात प्राचार्य सचिदानंद जोशी, राहूल आठवले, राज साखरे या तीन समन्वयकांची नेमणुक करण्यात आली होती.
९९ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती...नीट परीक्षेसाठी ९९ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. तर १ टक्के विद्यार्थी अनुपस्थित होते. नॅशनल टेस्टींग एजन्सीच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ५६ केंद्रावर परीक्षा पार पडली. सकाळी ११ आणि सांयकाळी पाच वाजेनंतर परीक्षा केंद्राबाहेर पालकांची मोठी गर्दी होती. दरम्यान, प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमेट्रीक हजेरी होती, असे समन्वयक सचिदानंद जोशी यांनी सांगितले.
परीक्षा केंद्राला जिल्हाधिकाऱ्यांची भेट...जिल्ह्यातील ५६ केंद्रावर रविवारी शांततेत नीट परीक्षा पार पडली. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दयानंद महाविद्यालय, स्वामी विवेकानंद महाविद्यालय येथील परीक्षा केंद्रांना भेटी देत आढावा घेतला. तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केलेल्या सुविधांची माहिती घेतली. सोबतच परीक्षेसाठी नेमणुक करण्यात आलेल्या विविध पथकांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या.