लातूर : औसा बसस्थानकातून लातूरच्या दिशेने निघालेली भरधाव एस.टी. बस समोरील ट्रकवर (एमएच २४ एयू ०३२३) आदळली. या अपघातात बसमधील ४० प्रवाशांपैकी २९ प्रवासी जखमी झाले आहेत. तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास पेठ गावानजिक घडली.
औसा आगाराचे चालक सूर्याजी गुरव हे औसा बसस्थानक येथून एस.टी. बस (एमएच २० बीएल ११२३) घेऊन लातूरच्या दिशेने १ वाजण्याच्या सुमारास निघाले होते. दरम्यान, पेठ गावच्या पुलानजिक समोर धावणाऱ्या ट्रक चालकाने अचानकपणे ब्रेक लावला. त्यामुळे बसच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस ट्रकवर आदळली. या अपघातात ४० प्रवाशांपैकी २९ प्रवासी जखमी झाले असून, दोन प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती एस.टी. महामंडळाच्या सूत्रांनी दिली.
जखमींमध्ये रुक्मिणबाई जंगाले, दयानंद जंगाले (दोघेही रा. कोरंगळा), प्रेमनाथ कांबळे (रा. लिंबाळा), रुपेश किरटकोरवे, महादेवी पाटील (रा. सत्तरधरवाडी), धनराज कलमे (रा. वाघोली), शेख लतिफ अहेमद (रा. खंदार गल्ली, औसा), केशर माळी (रा. नागरसोगा), अनुराधा पांचाळ (रा. लातूर), चंपाबाई अडसुळे (रा. हरंगुळ), शिवाप्पा कलशेट्टी (रा. शाम नगर, लातूर), सुनंदा माळी (रा. नागरसोगा), विमल जगताप (रा. लातूर), खुद्दुस शेख, नाहेद शेख, गजराबाई माळी, रुक्मिणबाई जगताप, शुभांगी माळी (रा. नागरसोगा), श्रीपती राठोड, राजकुमार बोकडे (रा. सत्तरधरवाडी), मुक्ताबाई चेंडके (रा. गंगापूर), विनायक पांचाळ (रा. माकणी), मुकुंद काळे (रा. समदर्गा), पार्वतीबाई राठोड (रा. सत्तरधरवाडी), बळीराम ढेकणे (रा. गांजनखेडा), शशीकला माळी (रा. नागरसोगा), प्रकाश गायकवाड, सिद्राम मुंडे (रा. औसा), आरोही पांचाळ (रा.लातूर) यांचा समावेश आहे.
या जखमींना लातूरच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अन्य दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांची नावे समजू शकली नाहीत. घटनास्थळी एस.टी. महामंडळाचे लातूर विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी भेट देऊन पाहणी केली.