लातूर : खरीप हंगामात कुठल्याही शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागाच्या वतीने चार महिन्यांत जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली. तेव्हा संशयास्पद असलेले बियाणे, खत, किटकनाशकांचे ८४३ नमुने घेतले. त्याची प्रयोगशाळेमार्फत तपासणी करण्यात आली असता ३० नमुने अप्रमाणित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कृषी केंद्रांना ताकीद देण्यात आली आहे.
खरीप हंगाम हुकुमी मानला जातो. वेळेवर दमदार पाऊस झाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ९ हजार ८३१ हेक्टरवर खरीपाचा पेरा झाला आहे. १०१.७३ टक्के पेरणी झाली आहे. सोयाबीनचा सर्वाधिक ४ लाख ९९ हजार २०० हेक्टरवर पेरा झाला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना दर्जेदार बी- बियाणे, खते आणि किटकनाशके मिळावीत. तसेच फसवणूक होऊ नये म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून अचानक भेटी देऊन तपासणी करण्यात आली.
जिल्ह्यात ११७५ कृषी सेवा केंद्र...जिल्ह्यात बियाणे विक्रीचे १ हजार १७५ कृषी सेवा केंद्र आहेत. तसेच खत विक्रीचे १ हजार ९२ तर किटकनाशक विक्रीचे ९६० परवाने आहेत. दरम्यान, एप्रिल ते जुलैअखेरपर्यंत जिल्हा, तालुकास्तरीय पथकामार्फत कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे.
प्रयोगशाळेत ११ घटकांची तपासणी...जिल्हा कृषी विभागाकडून घेण्यात आलेल्या संशयास्पद बियाणे नमुन्यांची तपासणी परभणी, खतांची छत्रपती संभाजीनगर आणि किटकनाशकांची अमरावती येथील प्रयोगशाळेत करण्यात येते. तिथे जवळपास ११ घटकांची तपासणी करण्यात येते. त्यानंतर ३० दिवसांपर्यंत अप्रमाणित नमुन्यांचा अहवाल कृषी विभागाकडे पाठविण्यात येतो. त्यानंतर कार्यवाही करण्यात येते.
एकूण ८४६ नमुन्यांचे उद्दिष्ट...प्रकार - उद्दिष्ट - साध्य - अप्रमाणितबियाणे - ४६८ - ५१४ - १०रासायनिक खते - २५१ - २३४ - १५किटकनाशके - १२७ - ९५ - ०५एकूण - ८४६ - ८४३ - ३०
निकृष्ट बियाणांचा सर्वाधिक धोका...शेतकरी महागामोलाची बी- बियाणे खरेदी करुन पेरणी करतात. निष्कृष्ट बियाणे लागल्यास शेती उत्पन्नावर पाणी फिरते. शिवाय, लागवडीचा खर्चही निष्फळ ठरतो. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून बियाणांवर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याचे जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक संतोष लाळगे यांनी सांगितले.
नियमानुसार तात्काळ कार्यवाही...बी- बियाणे, खते, किटकनाशकांच्या गुणवत्तेसंदर्भात शंका आल्यास तात्काळ नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येतात. जिल्ह्यात बियाणांचे १०, रासायनिक खतांचे १५ आणि किटकनाशकांचे ५ नमुने अप्रमाणित आल्याने नियमानुसार काही कृषी सेवा केंद्र चालकांना सुधारण्यासाठी ताकीद देण्यात आली. तसेच काहींवर न्यायालयीन खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.- मिलिंद बिडबाग, प्रभारी कृषी विकास अधिकारी.