लातूर : जिल्हा परिषदेच्या पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा, यासाठी विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. शाळा, केंद्र, तालुका आणि जिल्हास्तरावर झालेल्या परीक्षांमधून ३० विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था, बेंगलोर येथे सहलीसाठी निवड झाली आहे. यामध्ये दहा तालुक्यातील प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
शाळास्तरावर झालेल्या या परीक्षेला ३२ हजार ९४० विद्यार्थी सामोरे गेले होते. यामध्ये पाच मुले व पाच मुलींची केंद्रस्तरासाठी निवड झाली. केंद्रस्तरावर ५०६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील १० जणांना तालुकास्तरावर पाठविण्यात आले. तर तालुकास्तरावरील दहा जणांची जिल्हास्तरीय परीक्षेसाठी निवड करण्यात आली. दरम्यान, जिल्हास्तरावर १०० जणांनी परीक्षा दिली. यातून ३० जणांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था, बेंगलोर व परिसरातील विविध वैज्ञानिक स्थळांना भेट देण्यासाठी निवड झाली आहे. लवकरच या सहलीचे शिक्षण विभागाकडून नियोजन करण्यात येणार आहे.
या विद्यार्थ्यांना घडणार हवाई सफर...अहमदपूर तालुक्यातील ओंकार मिरजगावे, अक्षरा शिंदे, ऋतुजा कदम, उदगीर वैभवी कल्याणी, विजया येरनाळे, मयुरी कोयले, औसा करण वाघमारे, रोशनी कांबळे, स्नेहा आळंगे, चाकूर प्राजंली मिटकरी, भक्ती डोंगरे, प्रणाली कुलकर्णी, जळकोट समर्थ कुलकर्णी, साक्षी जानतिने, दिपिका गुट्टे, देवणी साहिली सगर, देवव्रत माने, सृष्टी पाटील, निलंगा प्रमोद पाटील, पृथ्वीराज सोमवंशी, शुभांगी कांबळे, रेणापूर कार्तिक बारसकर, श्याम मुंढे, दिव्या जाधव, लातूर लक्ष्मण मुगळे, श्रेया शिरसाठ, श्वेता मायंदे तर शिरुर अनंतपाळ तालुक्यातील समृद्धी साकोळे, सारीका डोंगरे आणि वैष्णवी शेळके या तीस विद्यार्थ्यांना हवाई सफर घडणार आहे.
सेस फंडातून होणार सहलीसाठी खर्च...भारतीय अंतराळ संशोधन संस्था बेंगलोर तसेच परिसरातील विविध वैज्ञानिक स्थळांना भेट देण्यात येणार आहे. त्यासाठी तीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, या विद्यार्थ्यांना ब्लेझर, शुजसह हवाई सफरचा खर्च जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी जाहीर केले आहे.
३२ हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा...विभागीय आयुक्तांच्या सुचनेनुसार स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. यामध्ये शाळास्तरावर ३२ हजार ९४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तसेच केंद्र स्तरावर ५०६६, तालुकास्तरावर १ हजार २० आणि जिल्हास्तरावर श्रीकिशन सोमाणी विद्यालयात १० मार्च रोजी झालेल्या परीक्षेला १०० विद्यार्थी सामोरे गेले. यातील प्रत्येक तालुक्यातील सर्वाधिक गुण घेणारे तीन विद्यार्थी हवाई सफरीसाठी निवडण्यात आले असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.