काेराेनाच्या पार्श्वभूमीवर गत मार्च २०२० पासून जाहीर करण्यात आलेल्या निर्बंधाचा फटका सर्वच व्यवहारांना बसला आहे. यातून सर्वच क्षेत्रातील उलाढाल ठप्प झाली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्या शेकडाे बसेस या काळात जाग्यावरच थांबून हाेत्या. दरम्यान, त्यातून महामंडळाचे शेकडाे काेटींमध्ये नुकसान झाले आहे. अद्यापही या आर्थिक संकटातून महामंडळाची लालपरी बाहेर आली नाही. केवळ जेमतेम व्यवसायावर प्रवासी सेवा सुरु करण्यात आली आहे. लातूर विभागाचा दैनंदिन ताेटा जवळपास १५ ते २० लाख रुपयांच्या घरात आहे. काेराेनापूर्वी हाच व्यवसाय ५५ ते ६० लाखांच्या घरात हाेता. आता ताे केवळ ३० ते ३५ लाखांच्या घरात आहे.
३ हजार ५४ कर्मचारी...
लातूरसह विभागातील उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा आगारातील ३ हजार ५४ कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये चालक ८५०, वाहक ९०० आणि इतर १ हजार ३०४ कर्मचारी संख्या आहे. गत ७० वर्षात पहिल्यांदास एस.टी.चे आर्थिक नियाेजन काेलमडले आहे. त्यातून वेतनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. लातूर विभागात जवळपास ४५० बसेसची संख्या आहे. आता टप्प्या-टप्प्याने प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, आर्थिक गाडी अद्यापही रूळावर आली नाही.
जुलै महिन्याचे झाले वेतन...
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची लालपरी सध्याला इंधनाला महाग आहे. दरदिवशी लाखाे रुपयांचा ताेटा सहन करून प्रवाशांना सेवा दिली जात आहे. अद्यापही ग्रामीण भागातील काही मार्गावर लालपरी सुरू झाली नाही. लांबपल्ल्याच्या मार्गावर रातराणी धावत आहे. लातूर विभागाला दरदिवशी किमान १५ ते २० लाखांचा ताेटा हाेत आहे. यातूनच कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनला. आता शासनाने केलेल्या मदतीवर जुलै महिन्याचे वेतन करण्यात आले आहे.