लातूर : सीटबेल्टचा वापर न करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी लातूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने सोमवारपासून विशेष मोहीम राबविली जात आहे. दरम्यान, सॊमवार आणि मंगळवारी करण्यात आलेल्या तपासणीत ३०८ वाहनधारक दोषी आढळून आले आहेत. त्यांच्यावर खटला दाखल करून, ६१ हजार ८०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
बुधवारी सकाळपासून नांदेड रोड, रिंगरोड परिसरात वाहन तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. अलीकडे रस्ते अपघाताच्या घटना मोठया प्रमाणावर घडत आहेत. परिणामी, यातील मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. रस्त्यावरील अपघातात सर्वाधिक जीवितहानी ही केवळ सीटबेल्ट न वापरल्याने झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. आता हे अपघातात आणि जीवितहानी टाळण्यासाठी लातूर पोलीस दलाने विशेष पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी सोमवारपासून 'सीटबेल्ट प्रबोधन मोहीम' हाती घेतली आहे.
सीटबेल्ट नसल्याने ८७ टक्के मृत्यूचे प्रमाण...रस्त्यावर होणाऱ्या अपघाताला निष्काळजीपणा, हायगय आणि वाहनाचा वेग हे महत्त्वाचे कारण समोर आले असून, सर्वाधिक जीवितहानी सीटबेल्ट न वापरल्याने झाल्याचे पुढे आले आहे. याची टक्केवारी ८७ वर आहे.
कारवाईसाठी यांनी घेतला पुढाकार...ही कारवाई लातूर शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील बिर्ला, पोलीसउप निरीक्षक आवेज काझी, पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख, जोतिर्लिंग सुरवसे, दिलीप राजोळे, अर्चना मठपती, नितीन मनाळे, अनुराधा डोंगरे, बाळासाहेब केंद्रे, अजय मस्के, हसुळे, डप्पवाड, मुंडकर यांच्या पथकाने केली.