चाकूर तालुक्याची निर्मिती १५ ऑगस्ट १९९२ रोजी झाली. तब्बल पाच वर्षांनंतर येथे पंचायत समिती अस्तित्त्वात आली. पहिले गटविकास अधिकारी म्हणून एस. आर. हिंगे यांनी पदभार स्वीकारला. १४ मार्च १९९७ ते २४ जुलै २०१७ या २० वर्षांच्या काळात २० गटविकास अधिकारी पंचायत समितीला लाभले. ८ नोव्हेंबर २०१७ला शाम गोडभरले यांनी पदभार घेतला. ते ८ मे २०१९ पर्यंत राहिले. त्यानंतर २० महिन्याच्या काळात बारा गटविकास अधिकाऱ्यांनी पंचायत समितीची धुरा सांभाळली. गटविकास अधिकारी सतत बदलत असल्याने विकासकामांवर परिणाम झाला आहे. रोजगार हमी योजनेची कामे रेंगाळली आहेत, तर घरकूल योजनेचे हप्ते लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नाहीत. अनेक विकासकामात अडथळे निर्माण होत आहेत. ग्रामपंचायत स्तरावर विकासकामांची प्रगती होत नाही. अशी ओरड सरपंच मंडळींसह जनतेतून होत आहे. अलीकडच्या काळात गटविकास अधिकारी पदावर अधिकारी राहण्यात धजत नाहीत. त्यांच्या कामकाजात राजकीय हस्तक्षेप वाढल्याचे बाेलले जात आहे. परिणामी, सरळ बदली करून घेण्यावर अधिक भर दिला जात आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी आकाश गोकनवार यांच्याकडे पूर्वी तीनदा प्रभारी म्हणून पदभार देण्यात आला होता. आता चाैथ्यांदा त्यांच्याकडे पदभार दिला गेला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समिती गटविकास अधिकारी पदावर कर्तव्यदक्ष, मुख्यालयी राहणाऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी सरपंचवर्गासह जनतेतून होत आहे. कायमस्वरुपी गटविकास अधिकारी नसल्याने ग्रामपंचायतींच्या विविध विकासकामांची गती मंदावली आहे.
अडीच दशकात चाकूर पंचायत समितीत ३४ गटविकास अधिकारी।
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 6:22 AM