लातूर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सदस्यपदासह थेट सरपंच निवडीसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केला. त्यानुसार जिल्ह्यातील ३५१ ग्रामपंचायतीचे सदस्य आणि थेट सरपंच निवडीसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होईल. बुधवारपासून या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शुक्रवार, १८ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर निवडणुकीची सूचना प्रसिद्ध केली जाईल. या निवडणुकीसाठी सोमवार, २८ नोव्हेंबर ते शुक्रवार, २ डिसेंबर दरम्यान सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार आहेत.
नामनिर्देशनपत्र छाननी सोमवार, ५ डिसेंबर रोजी सकाळी अकरापासून सुरू होईल. तसेच बुधवार, ७ डिसेंबर रोजी दुपारी तीनपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. त्याच दिवशी दुपारी तीननंतर निवडणूक चिन्ह नेमून देऊन अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. आवश्यक असल्यास रविवार, १८ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान घेतले जाईल.
जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने तहसीलदारांनी निश्चित केलेल्या ठिकाणी २० डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २३ डिसेंबरपर्यंत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
या भागात आचारसंहिता लागु राहणार...रेणापूर, औसा, निलंगा आणि चाकूर या तालुक्याच्या संपूर्ण आणि उर्वरित तालुक्यात ज्या ग्रामपंचायतीची निवडणूक आहे ती ग्रामपंचायत व लगतची गावे इथे आचार संहिता लागू असेल. शहरी भागात आचार संहिता लागू नसली तरी ग्रामपंचायतीच्या मतदारावर प्रभाव पडेल अशा प्रकारची कोणतीही कृती अगर भाष्य नागरी क्षेत्रात करता येणार नाही.
निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या...अहमदपूर - ४२औसा - ६०चाकूर - ४६जळकोट - १३लातूर - ४४निलंगा - ६८शिरूर अनंतपाळ - ११उदगीर - २६देवणी - ८रेणापूर - ३३