लातूर- कर्नाटकातील शिमाेगा येथून ५ एप्रिलला ३५० पाेती सुपारी घेऊन दिल्लीकडे निघालेला ट्रकच लातुरातील गरुड चाैक, नांदेड राेड येथून चाेरीला गेल्याची तक्रार विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात नाेंद केली हाेती. दरम्यान, पाेलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत, चाेरीतील ३५ लाख ५२ हजार ५०० रुपयांच्या सुपारीसह चार आराेपींच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांना नागपूर, औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यांतून अटक करण्यात आली आहे.
पाेलिसांनी सांगितले की, व्यवस्थापक पीरबेग आब्दुला बेग (रा. आरएमएल नगर, शिमाेगा, कर्नाटक राज्य) यांनी न्यू डायमंड ट्रान्स्पाेर्ट कंपनीकडून दिल्लीसाठी कर्नाटक राज्यातील शिमाेगा येथून ५ एप्रिल रेाजी ट्रक (एम.एच. २६ बीई ३९६५) मधून ३५० सुपारीची पाेती (किंमत ३५ लाख ५२ हजार ५००) पाठविली हाेती. दरम्यान, या मालाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली. शिवाय, स्वत: चालकाने ट्रक चाेरीला गेल्याची तक्रार ठाण्यात दाखल केली. अधिक चाैकशीनंतर तक्रारदारावरच संशय बळावला. त्याला विश्वासात घेत चाैकशी केली असता, सुपारी आणि ट्रकची परस्पर विल्हेवाट लावल्याची कबुली दिली. याबाबत व्यंकटी बालाजी गायकवाड (रा. बारड, ता. मुदखेड, जि. नांदेड), अनिरुद्ध ऊर्फ बाळू भारत मिसाळ (रा. औरंगाबाद), फारुख अहेमद खान (रा. गाेरेवाड राेड, नागपूर) आणि हुसेन नासर शेख (रा. मालटेकडी राेड, नांदेड) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चाेरीतील ३४९ पाेती सुपारी जप्त केली आहे.
ही कारवाई पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पाेलीस अधीक्षक अनुराग जैन, लातूर शहर उपविभागीय पाेलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पाेलीस उपनिरीक्षक महेश गळगटे, जिलानी मानुल्ला, बालाजी गाेणारकर, बुड्डे-पाटील, रामचंद्र ढगे, मुन्ना पठाण, संजय कांबळे, विलास फुलारी, रामलिंग शिंदे, दयानंद सारुळे, खंडू कलकत्ते, रमेश नामदास, महेश पारडे, विनाेद चलवाड, अशाेक नलवाड, नारायण शिंदे, सायबर सेलचे संताेष देवडे, रियाज साैदागर, गणेश साठे यांच्या पथकाने केली.