हरी मोकाशे, लातूर : शहरातील औसा रोडवरील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमधील मुलींना भोजनातून विषबाधा झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. मळमळ व उलटीचा त्रास जाणवणाऱ्या ४० मुलींना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने कोणाची प्रकृती चिंताजनक नाही.
शहरातील औसा रोडवर पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन आहे. या महाविद्यालयाच्या वस्तीगृहात ३२४ मुली राहतात. नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री ७ वाजता मुलींनी भात, चपाती, भेंडीची भाजी, आणि वरण भोजन केले. त्यानंतर साडेआठ वाजण्याच्या सुमारास काही मुलींना मळमळ होऊन उलटीचा त्रास जाणवू लागला. या घटनेची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मिळाल्यानंतर ते तात्काळ दाखल झाले आणि पाहणी करून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते यांना माहिती दिली.
मळमळ व उलटीचा त्रास होणाऱ्या मुलींना तात्काळ रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रात्री १२.३० वाजेपर्यंत जवळपास ४० मुलींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्व डॉक्टर रुग्णालयात दाखल झाले असून त्यांच्यावर तात्काळ उपचार करीत आहे. कोणाची प्रकृती गंभीर नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. उदय मोहिते हे रुग्णालयात दाखल होऊन आवश्यक त्या सूचना करीत आहेत.
सर्व मुलींची प्रकृती चांगली...
रात्रीच्या भोजनातून दोघी मुलींना उलटी झाली तर काही मुलींना मळमळ होत असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू आहेत. आवश्यकतेनुसार सलाईन लावण्यात आले आहे. आतापर्यंत जवळपास 40 मुलींना दाखल करण्यात आले आहे. आणखीन काही मुली उपचारसाठी दाखल होत आहेत. सर्वांची प्रकृती चांगली आहे. सर्व डॉक्टर हजर होऊन उपचार करीत आहे. त्यामुळे पालकांनी काळजी करू नये. - डॉ. उदय मोहिते, अधिष्ठाता, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय.
उपचारसाठी तात्काळ दाखल...
वसतिगृहातील काही मुलींना मळमळ होऊन उलटी झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे आम्ही तात्काळ दाखल झालो. त्रास जाणवणाऱ्या सर्व मुलींना विनाविलंब शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारसाठी पाठवण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती चांगली आहे. कुठलाही धोका होऊ नये म्हणून सर्व मुलींची आरोग्य तपासणी करून घेत आहोत. त्यामुळे काळजी करू नये. - प्राचार्य व्ही.डी. नितनवरे, पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन.
अन्न नमुने घेतले...
या घटनेची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली. तेथील पोलिसांनी येऊन आवश्यक ती मदत केली त्याचबरोबर अन्न नमुने घेतले आहेत. अहवालानंतर कशातून विषबाधा झाली, हे समजेल असे प्राचार्य नितनवरे यांनी सांगितले.