लातूर : कमी किमतीत दाेन किलाे साेन्याच्या विटा देताे, असे आमिष दाखवत एका शेतकऱ्याला तब्बल ४० लाखांना गंडविल्याची घटना ताजपूर (ता. निलंगा) येथे घडली. याबाबत शिरुर अनंतपाळ पाेलिस ठाण्यात तिघांविराेधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, निलंगा तालुक्यातील ताजपूर येथील संभाजी शिवाजीराव साेमवंशी (वय ४२) हे शेतकरी असून, त्यांच्याकडे स्वत:च्या मालकीची शेतजमीन आहे. जवळपास दाेन वर्षांपूर्वी त्यांना निटूर येथील नातेवाईक विश्वनाथ ज्ञानाेबा साेमवंशी यांनी दाेन किलाे साेन्याच्या विटा आहेत, तुम्हाला हव्या आहेत का? अशी विचारणा केली हाेती. कमी किमतीमध्ये मिळणाऱ्या साेन्याच्या विटांबाबत संभाजी साेमवंशी यांची विश्वनाथ साेमवंशीसह मित्र रमेश पांडुरंग चव्हाण (रा. अक्कलकाेट, जि. साेलापूर) आणि संजय मटारज स्वामी (रा. घुमणगाव, ता. नेवासा, जि. नगर) यांची भेट झाली. भेटीमध्ये दाेन किलाे साेन्याच्या विटा त्यांना देण्याचे ठरले. या बदल्यात ४० लाख रुपयांची मागणी करण्यात आली.
शेतकरी संभाजी साेमवंशी यांनी साेन्याच्या विटा मिळत असल्याने आपली अडीच एकर जमीन विकली. त्यातून आलेली तब्बल ४० लाख रुपयांची रक्कम विविध माध्यमातून वेळाेवेळी दिली. त्यानंतर त्यांना साेन्याच्या विटा देण्यात आल्या. चाैकशी केल्यानंतर या विटा साेन्याच्या नसून, त्या पितळ धातूच्या असल्याचे समाेर आले. त्यामुळे त्यांना एकच धक्का बसला. याबाबत शिरुर अनंतपाळ पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी तिघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.