- राजकुमार जाेंधळे मुरुड (जि. लातूर) - एका ४० वर्षीय तरुणाचा कोयत्यासह धारदार शस्त्राने वार करुन, गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना करकट्टा (ता. लातूर) गावात रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मुरुड पाेलिस ठाण्यात पाच जणांविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, वैशाली शरद इंगळे (वय ४०) यांनी मुरुड पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, आरोपी क्र. १ ते ५ यांनी संगनमत करून व कट रचून महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून मनात राग धरून पती शरद प्रल्हाद इंगळे याचा रविवारी करकट्टा येथील खडी केंद्रावर ऊस तोडण्याच्या कोयत्याने हल्ला करून खून करण्यात आला. आरोपींनी यावेळी अर्धवट अवस्थेत मयताचा गळा चिरल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. करकट्टा येथील मुकादम म्हणून काम करणारा शरद प्रल्हाद इंगळे हे गावालगत असलेल्या खडी केंद्रावर रविवारी कामाला गेले होते. दरम्यान, आरोपींनी खडी केंद्रावर जाऊन शरद इंगळे यांच्यावर कोयता आणि धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. यामध्येच त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती मुरुड ठाण्याचे सपोनि. अशोक उजागरे यांनी दिली.
ते मारेकरी दुचाकीवरुन पसार हाेताना एकाने पाहिले तरुणाच्या डाेक्यावर, शरीरावर सपासप वार केल्यानंतर शरद प्रल्हाद इंगळे हा तरुण जाग्यावरच रक्ताच्या थाराेळ्यात काेसळला. मृत्यू झाल्याची खात्री झाल्याने मारेकरी दुचाकीवरुन पसार झाले. मारेकरी पसार हाेताना गावातील एका व्यक्तीने त्यांना पाहिले. ताे घटनास्थळी दाखल हाेत पाहिले असता, शरद इंगळे याचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती त्यांनी नातेवाईकांना फोनवरून दिली.
खुनानंतर ‘त्या’ मारेकऱ्यांचे कपडे रक्ताने माखली हाेती खुनानंतर मारेकऱ्यांचे कपडे हे रक्ताने माखले हाेते. त्याला संशय आल्याने ताे खडीकेंद्र येथे येवून पाहिला असता, गावातीलच तरुणाचा मृतदेह पडल्याचे प्रत्यक्षदर्शीला दिसून आले. त्याने ही माहिती नातेवाईकांना दिली.
मारेकऱ्यांच्या नातेवाईकांची चाैकशी संशयीत मारेकऱ्यांच्या नातेवाईकांची सध्याला चाैकशी सुरू आहे. खुनात नेमके कोण-कोण सहभागी होते, याचा तपास पोलिस करत आहेत. मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या जातील, असे मुरुड पाेलिसांनी सांगितले.
पाच जणांविरोधात मुरुड पोलिसात गुन्हा दाखल मयताची पत्नी वैशाली इंगळे यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणात रोहन उर्फ सोंट्या बाळासाहेब शिंदे, रोहित उर्फ दाद्या बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब भारत शिंदे, गणेश भारत शिंदे आणि अन्य एक महिला (सर्व रा. करकट्टा, ता.जि. लातूर) यांच्याविरोधात मुरुड पोलिस ठाण्यात गु.र.नं. १०१/२०२५ कलम १०३, ६१ (२), ३ (५) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
करकट्टा शिवारातील खेडी केंद्रानजीकची घटना करकट्टा शिवारातील एका खडी केंद्रानजीकच्या मैदानात खुनाची घटना घडली. या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. फिर्यादीने हा खून अनैतिक संबंधाचा राग मनात ठेवून करण्यात आल्याचे जबाबात म्हटले आहे. याचा तपास पोउपनि. नागरगोजे करीत आहेत. घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.