- संदीप अंकलकोटेचाकूर : तालुक्यात ट्रॉन्सफार्मरसाठी लागणाऱ्या आईलचा गेल्या महिनाभरापासून तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ट्रॉन्सफार्मरला ऑईल पुरवठा होत नसल्याने तालुक्यातील अनेक गावातील डीपी बंद आहेत. कृषीचाही विद्युत पुरवठा खंडीत झाला असून, काही गावात पर्यायी डीपी वरून विजपुरवठा सुरुळीत करण्याचा प्रयत्न केला. परंतु विजेचा दाब व्यवस्थित नसल्याने अनेकांच्या घरची विद्युत उपकरणे जळून गेली आहेत. महावितरण कंपनीकडे ऑाईलसाठा उपलब्ध नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.
तालुक्यातील जानवळ, वडवळ नागनाथ, लातूररोड, मष्णनेरवाडी, देवंग्रा, बोथी, नळेगाव, शिवणखेडसह काही गावातील ट्रॉन्सफार्मर जळाले आहेत. सरासरी सिंगल फेसच्या २१ तर थ्रीफेसच्या २० ट्रॉन्सफार्मरला सध्या तरी ऑईल उपलब्ध नाही. त्यामुळे त्या डीपी वरुन होणारा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. उष्णतेची तीव्र लाट आहे. त्यामुळे घरात पंखा, कुलरसाठी विजेची आवश्यकता आहे. काही ठिकाणी दुसऱ्या ट्रॉन्सफार्मरवरून वीज घेण्यात आली. परंतु विजपुरवठा सुरळीत होत नसल्याने विजेचे केबल, किटक्याट जळणे असे प्रकार वाढले आहेत. त्यातच विजेचा योग्य दाब मिळत नसल्याने फ्रीज, कुलर अशी घरगुती उपकरणे जळत आहेत. चाकूर तालुक्यातील ट्रॉन्सफार्मरला किमान दरमहा सुमारे दोन ते तीन हजार ऑईलची आवश्यकता असते. महिनाभरापासून ऑईल मिळत नसल्याने विज ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
ऑईलसाठी मागणी केली आहे...सिंगल फेज ट्रॉन्सफार्मरला ६० लिटर ऑईल लागते. ६३ के.व्ही.च्या डीपीसाठी १६० लिटर तर १६० के.व्ही.च्या डीपीसाठी २०० लिटर ऑईल ऑईलची गरज असते. ट्रॉन्सफार्मरला ऑईल नसल्याने ४१ ट्रॉन्सफार्मर बंद पडली आहेत. ट्रान्सफार्मर ऑईलची मागणी केली आहे. ऑईल उपलब्ध होताच ट्रॉन्सफार्मर दुरुस्त करुन विजपुरवठा पुर्वरत करणार आहे. - सुशील देवडे, सहाय्यक अभियंता
कृषी पंपाचा विजपुरवठा बंदच...महावितरण कंपनीकडे ट्रॉन्सफार्मर ऑईल उपलब्ध नाही. गेल्या महिनाभरापासून ऑईलचा तुटवडा होत आहे. ही गंभीर बाब आहे. उष्णतेची लाट असून, गावात, शेतात विजेची गरज आहे. महावितरण कंपनीने आता तरी लवकर ऑईल पुरवठा करुन ट्रॉन्सफार्मर सुरु करावेत. - नागनाथ पाटील, चाकूर