लातूर : लातूर लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी सकाळी ७ वाजेपासून मतदान सुरु असून, दुपारी ३ वाजेपर्यंत ४४.४५ टक्के मतदान झाले आहे. अद्यापही मतदानासाठी तीन तास शिल्लक असून, यामध्ये आणखीन वाढ होणार असून, उन्हाचा पारा वाढल्याने प्रतिसाद मंदावला आहे. सायंकाळी पाच वाजेनंतर नागरिक पुन्हा मतदानासाठी बाहेर पडतील असे चित्र आहे.
लातूर लोकसभेसाठी मंगळवारी सकाळी ९ वाजेपर्यंत ७.९३ टक्के मतदान झाले होते. तर दुपारी ११ वाजेपर्यंत २०.७४ टक्के, दुपारी १ वाजेपर्यंत ३२.७१ टक्के तर तीन वाजेपर्यंत ५० टक्के मतदान झाले आहे. मतदारसंघातील लातूर, लातूर ग्रामीण, निलंगा, रेणापूर, चाकूर, अहमदपूर, जळकोट, शिरुर अनंतपाळ, लोहा-कंधार, उदगीर आदी मतदारसंघातील २१७५ केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरळीत सुरु आहे. सकाळच्या वेळी जिल्ह्यातील चार केंद्रात तांत्रिक अडचण आल्याने काहीवेळ मतदान थांबले होते.
मात्र, प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्यात आल्याने अर्ध्या तासात या मतदान केंद्रावर मतदान सुरळीत सुरु झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत लोहा मतदारसंघात ४२ टक्के, लातूर शहर ४३, लातूर ग्रामीण ४६, उदगीर ४५, निलंगा ४४, अहमदपूर मतदारसंघात ४५ टक्के मतदान झाले आहे. सांयकाळी ६ वाजेपर्यंत मतदान चालणार असून, दुपारच्या वेळी तापमानाचा पारा ४२ अंशावर पोहोचल्याने काही केंद्रावरील प्रतिसाद मंदावला होता. मात्र, आता ४:३० वाजेनंतर पून्हा मतदानासाठी मतदार बाहेर पडतील अशी शक्यता आहे.