लातूर : शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी घडलेल्या घरफाेडीचा स्थानिक गुन्हे शाखा आणि विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यांच्या विशेष पथकाने उलगडा केला आहे. घरफाेडीच्या घटनेत चाेरीला गेलला तब्बल ४५ लाखांचा मुद्देमाल आराेपींकडून जप्त करण्यात आला आहे. फिर्यादीला ताे मंगळवारी परत करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफाेडी प्रकरणी एकूण १३ गुन्हे दाखल करण्यात आले हाेते. या घरफाेडीचा तपास करण्याबाबत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे आणि विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्याेच पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकाने घरफोडीच्या गुन्ह्याची उकल केली. विशेष पाेलीस पथकाने या घरफाेडीचा तपस करत विविध गुन्ह्यांची उकल केली आहे. दाखल असलेल्या गुन्ह्यातील मोक्कासारख्या कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेल्या सराईत आणि अट्टल आठ आरोपींना अटक करण्यात आली. चाैकशीत घरफाेडी, चाेरीतील मुद्देमाल पाेलिसांनी जप्त केला. दरम्यान,चोरीला गेलेला ४५ लाखांचे ९० तोळे सोन्याचे दागिने आराेपींकडून हस्तगत करण्यात आले. जप्त करण्यात आलेला ४५ लाखांचा मुद्देमाल तक्रारदाराला पाेलिसांनी परत केला आहे.
माेठी घरफाेडी केली उघड...
लातूरसह जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या चाेरी, घरफाेडीच्य घटनांचा तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि विशेष पथकाकडून समांतर करण्यात आला. यामध्ये सर्वाधिक माेठी घरफाेडी पाेलिसांना उघड करण्यात यश आले आहे. आराेपीला पाेलिसी हिसका दाखवताच घरफाेडीतील ४५ लाखांचा मुद्देमाल आराेपींनी पाेलिसांकडे दिला. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि विवेकानंद चाैक ठाण्यांच्या पथकाची कामगारी महत्वाची ठरली आहे.