अहमदपूर : तालुक्यात एप्रिलमध्ये कोरोनाची सर्वाधिक तीन हजार रुग्ण आढळले होते. मेच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या घटत आहे. मात्र, या कालावधीत ४८ बालके कोरोनाबाधित आढळली आहेत. त्यामुळे तालुक्यात बाल कोविड हॉस्पिटल सुरू करून विशेष उपचार सुविधा सुरू करणे गरजेचे ठरत आहे.
अहमदपूर तालुक्यात एप्रिलमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला. तेव्हा तीन हजार रुग्ण होते. मात्र मे मध्ये रुग्णसंख्या कमी झाली आहे. मात्र, बालकांना संसर्ग होण्याचे प्रमाण आढळून आले आहे. घरातील एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यास त्याचा संसर्ग बालकांपर्यंत पोहोचत आहे. मार्चपासून आतापर्यंत ४८ बाधित आढळले आहेत. सध्या १६ ॲक्टिव्ह रुग्ण असून १४ रुग्ण लातुरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे ठरत आहे. बालकांसाठी विशेष कोविड सल्ला केंद्र अथवा कोविड केअर हॉस्पिटल तयार करणे गरजेचे आहे. बालकांमध्ये कोरोनाची प्राथमिक लक्षणे असले तरी पोस्टकोविडमध्ये घातक लक्षणे असून, हृदयाचे ठोके वाढणे, हृदयाचे स्नायू कमजोर होणे अशी लक्षणे आढळत आहे.
बालकांमधील कोविडची लक्षणे...
ताप येणे, अंगावर लाल चट्टे होणे, प्लेटलेट्स कमी होणे, उलटी व जुलाब होणे, चिडचिडेपणा वाढणे, मोठ्या मुलांमध्ये कमजोरी होणे अशी लक्षणे आढळून येत आहेत. पोस्ट कोविडमध्ये हृदयाचे ठोके वाढणे, हृदयाचे स्नायू कमजोर होणे अशी लक्षणे आहे. महिनाभरात १५ बालकांवर यशस्वी उपचार केल्याचे बालरोग तज्ज्ञ डॉ. नागेंद्र यलमोटे यांनी सांगितले. सुदैवाने एकही मृत्यू नाही.
गृहविलगीकरणात २५३ रुग्ण...
तालुक्यात गृहविलगीकरण २५३ जण आहेत. १ ते ४० वयोगटांत १४७, ४० ते ६० वयोगटांत ५२, ६० वर्षांपुढील ५४ रुग्ण आहेत. १ ते १४ वयोगटात १६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील दासरे यांनी सांगितले.
बालरुग्ण लातूरला रेफर...
तालुक्यात मार्चपासून विविध लक्षणे असलेले रुग्ण आढळून येत आहेत. त्यातील बहुतांश बालरुग्णांना लातूरला पाठविण्यात आले आहे. तिथेच त्यांच्यावर उपचार करण्यात आले, असे बालरोग तज्ज्ञ डॉ. सतीश पेंड यांनी सांगितले.
चाचणी करून उपचार...
बालकांमध्ये ताप, सर्दी, जुलाब अशी लक्षणे दिसत आहेत. त्यासाठी अँटिजन तपासणी आवश्यक आहे. त्यानंतरच उपचार केले जात असल्याचे डॉ. राजूरकर व डॉ. जीवणे यांनी सांगितले.