शिरूर अनंतपाळ (जि. लातूर) : येथील नगरपंचायत इमारतीत असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर सोमवारी पहाटेच्या सुमारास दराेडेखाेरांनी धाडसी दरोडा टाकला आहेत. तब्बल २७ लाखांची राेकड आणि जवळपास २२ लाखांचे साेने असा एकूण ५० लाखांचा मुद्देमाल पळविला असल्याची माहिती बॅंकेचे शाखा व्यवस्थापक सौरभ खैरे यांनी दिली. या घटनेने लातूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळास उपविभागीय पोलीस अधिकारी निकेतन कदम यांनी भेट देऊन पाहणी केली. याबाबत शिरुर अनंतपाळ पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
शाखा व्यवस्थापक सौरभ खैरे यांनी सांगितले, महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा शिरूर आनंतपाळ येथे मध्यवर्ती ठिकाणी आहे. शिरुर अनंतपाळ शहरासह तालुक्यातील १४ गावातील खातेदारांचा दैनंदिन व्यवहार या बँकेवर अवलंबून आहे. शाखा व्यवस्थापक नेहमीप्रमाणे बँक उघडण्यासाठी सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास आले असता, त्यांना बँकेचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडल्याचे आढळून आले. त्यांनी लातूर येथील विभागीय कार्यालयाशी संपर्क साधत ही माहिती दिली. बँकेत प्रवेश केल्यानंतर मुख्य लॉकर तोडून त्यातील तब्बल २७ लाखांची राेकड पळविल्याचे समाेर आले.
याची माहिती पोलीस ठाण्याला माहिती दिली असता, पोलीस निरीक्षक रामेश्वर तट हे घटनास्थळी दाखल झाले. तर लातूर येथील शवानपथकालाही पाचारण करण्यात आले. सहायक पाेलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी भेट दिल्यानंतर घटनास्थळाला पंचनामा करण्यात आला. दरम्यान, सहायक पाेलीस अधीक्षक कदम यांनी घटनेचा तातडीेन छडा लावण्यासाठी, आरोपींना पकडण्यासाठी पाेलीस पथके तैनात केली आहेत.
शिरूर अंनतपाळ नगरपंचायतीच्या इमारतीचे बांधकाम सुरु असल्याने आजूबाजूच्या खिडक्या रिकाम्या आहेत. येथूनच दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केला असावा, असा प्राथमिक अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला आहे. तर मुख्य लॉकरला पाच प्रकारचे लॉक असून, दरोडेखोराने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा दरोडा टाकल्याचे समाेर आले आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यात पडलेला हा पहिलाच माेठा दराेडा आहे. परिणामी, एकच खळबळ उडाली आहे. याबाबत शिरुर अनंतपाळ पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.