किल्लारी (जि. लातूर): टाळ- मृदंग, ढोल- ताशांचा गजर आणि हाती पतका घेऊन हर हर महादेव, शिव- शिव सांब सदाशिवचा जयघोष करीत श्री नीळकंठेश्वराची सोमवारी दुपारी पालखी मिरवणूक झाली. यावेळी हजारो भाविकांनी दर्शन घेतले. आम्ही जातो आमुच्या आमचा राम राम घ्यावा, असे म्हणत यात्रा महोत्सवाची उत्साहात सांगता झाली.
ग्रामदैवत श्री नीळकंठेश्वर यात्रा ११ दिवसांपासून सुरु होती. यात्रेनिमित्त दर्शन व नवस पूर्ण करण्यासाठी जिल्ह्याबरोबर राज्यातील तसेच कर्नाटकातील भाविक रीघ होती. कदेर (ता. उमरगा) च्या येथील लेकमातेने ३५ किमी दंडवट घालून नवस पूर्ण केला. दुपारी यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण पाटील मुरुमकर, महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे उपाध्यक्ष संतोष सोमवंशी यांच्या हस्ते महापूजा व महाआरती झाल्यानंतर पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. दिंड्या, पताका घेऊन, टाळ- मृदंग, ढोल- ताशांच्या गजरात हर हर महादेव असा जयघोष करीत पालखी पुर्नवसित गावात दाखल झाली. दरम्यान, पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पालखीच्या स्वागतासाठी इंदिरा कन्या हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी ५ किमीपर्यंत रांगोळी काढली होती.
दरम्यान, सकाळी हभप संभाजी झरे व त्यांच्या संघाचा समाजप्रबोधनासाठी भारुडाचा कार्यक्रम झाला. पालखी मार्गात भाविकांनी पूजा करुन दर्शन घेतले. जुनी किल्लारी ते पुनर्वसित किल्लारी अशी ५ किमीची ही पालखी मिरवणूक निघाली. हा पालखी सोहळा एक किमी लांब होता. टाळ- मृदंगाच्या गजरात भाविक तल्लीन होऊन नाचत होते. तसेच महिला, पुरुष भाविकांनी फुगडीचा घेरही धरला.महोत्सवात भाविकांसाठी सूर्यकांत बाळापुरे, जनार्धन डुमने, बालाजी चव्हाण, विक्रम भोसले यांच्या संयोजनाने ५०० वाहनधारकांनी मोफत यात्रा सेवा दिली. त्यासाठी अनिल भोसले, गणेश कांबळे, संतोष दुधभाते, ईश्वर साखरे, सुमिरसिंग राजपूत यांनी परिश्रम घेतले. यावेळी सपाेनि. सुनील गायकवाड, पीएसआय राजपूत, पोहेकॉ. दत्ता गायकवाड, गौतम भोळे, पीएसआय आबा इंगळे, पोहेकॉ बी.बी. कांबळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
महोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी बिसरसिंग ठाकुर, शिवराम कांबळे, राजेंद्र जळकोटे, देविदास मिरकले, अंकुश भोसले, पप्पू भोसले, गोविंद भोसले, शिवराज जळकोटे, डिगंबर भोसले, दगडू भुजबळ, प्रशांत गावकरे, मडोळे, तानाजी चाकुरे, भारत बोळशेट्टे, संजय गावकरे, राजू बिराजदार, श्याम घोरपडे, मल्लिकार्जुन उमाटे, पहारेकरी मंडळींनी परिश्रम घेतले. पालखी मार्गादरम्यान भाविकांसाठी फराळ, चहा, पाण्याची मोफत सेवा दानशुरांनी उपलब्ध केली होती. यशस्वीतेसाठी बाळू महाराज, ईश्वर मास्तर, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गावकरे, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, चंद्रकात बाबळसुरे, मनोहर गवारे, सुभाष लोव्हार, नामदेव माळवदे, नीळकंठ बिराजदार आदींनी परिश्रम घेतले.