लातूर : राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वच बसमधून प्रवास करताना महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. या महिला सन्मान योजनेची अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरू झाली असून, मागील दोन दिवसात जिल्ह्यात ५० हजार ४३२ महिलांनी सवलतीत प्रवास केला आहे. यातून महामंडळाला १३ लाख ७ हजार ६४ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
अर्थसंकल्पामध्ये महिला सन्मान योजनेची घोषणा करण्यात आली होती. यात सर्वच महिलांना बसमधून प्रवास करताना ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, याची अंमलबजावणी लवकर होत नव्हती. त्यामुळे रेणापुरात महिला प्रवासी आणि वाहकाचा वादही झाला होता. समाजमाध्यमांवर याबाबत चर्चा होताच राज्य शासनाने महिला सन्मान योजनेची अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरू केली आहे. जिल्ह्यात योजनेच्या पहिल्याच दिवशी १४ हजार ३९२ महिलांनी प्रवास केला. तर शनिवारी ३६ हजार ४० महिलांनी एसटीमधून सवलतीत प्रवास केल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. लातूर विभागात उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा आणि लातूर या पाच आगारांचा समावेश असून, सध्या पाचही आगारांमध्ये या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. दरम्यान, योजना लागू झाल्याने एसटी महामंडळाकडे महिला प्रवाशांची गर्दी वाढली असल्याचे चित्र आहे.
एसटी बसला महिलांचा वाढता प्रतिसाद...महिला सन्मान योजना सुरू झाली त्याचदिवशी १४ हजार ३९२ महिलांनी प्रवास केला. तर दुसऱ्या दिवशी ३६ हजार ४० महिलांनी एसटीने प्रवास करत योजनेचा लाभ घेतला. दरम्यान, जिल्ह्यात दोन दिवसात ५० हजार ४३२ महिलांनी सवलतीत प्रवास केला असून, एसटी बसेसना महिला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. दोन दिवसात लातूर आगारातून ११ हजार ८२५, उदगीर आगारातून १२ हजार ५७३, अहमदपूर आगारातून ८ हजार ३५९, निलंगा आगारातून १० हजार १६२ तर औसा आगारातून ७ हजार ५१३ महिलांनी सवलतीत प्रवास केला आहे.