- बालाजी थेटेऔराद शहाजानी (जि.लातूर) : निलंगा तालुक्यातील सोनखेड येथे तीन दिवसांपासून एका वानराने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत या वानराने ५० जणांना जखमी केले असून, यातील दोघेजण गंभीर आहेत. दरम्यान, या वानराला पकडण्यासाठी वन विभागाचे ५०हून अधिक कर्मचारी गावात दाखल झाले असून, त्यांनी गावाला घेराव घातला आहे.
निलंगा तालुक्यातील सोनखेड गावात एका वानराने धुमाकूळ घातला आहे. सुरुवातीला एक-दोघांना चावा घेतल्याने ग्रामस्थांनी दुर्लक्ष केले. मात्र, कालपासून हा वानर माणूस दिसताच त्याच्यावर हल्ला करून जखमी करत आहे. या वानराच्या हल्ल्यात आतापर्यंत ५० जण जखमी झाले असून, त्यांच्यावर शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वानराच्या हल्ल्यात एक पुरुष व महिला गंभीर जखमी झाले आहेत. ग्रामपंचायत व वन विभागाने गावात दवंडी देऊन ग्रामस्थांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. गावातील सर्व व्यवहार ठप्प असून, भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, निलंगा तहसीलदारांना गावातील परिस्थितीबाबत कळविले असल्याचे सरपंच नागनाथ स्वामी यांनी सांगितले.
जाळे टाकून पकडण्याचा प्रयत्न...सोनखेड येथे वानराला पकडण्यासाठी वन अधिकारी संताेष बन, देवणी विभागाचे वन अधिकारी नामदेव डिगाेळे, डी. डी. मंगरुटे, एस. वाय. बडगणे, पारसेवाड आदींचे पथक गावात गस्त घालत असून, वानराच्या मार्गावर जाळे टाकण्यात आले आहे. मात्र, शुक्रवारी दुपारी ३:३० वाजेपर्यंत वानर वन विभागाच्या हाती लागलेला नाही.