राजकुमार जाेंधळे / लातूर : अंगणवाडीत मदतनीस म्हणून रिक्त पदावर नियुक्ती देण्याच्या कामासाठी ८० हजारांच्या लाचेची मागणी करुन, ५० हजारांची लाच स्विकारताना लातूर बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील शिपाई भगवान रोहिदास बनसोडे (वय ४८) याला लातुरातील एसीबी पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी दुपारी केली असून, याबाबत शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
शासनाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) लातूर कार्यालयाकडून अंगणवाडी मदतनीस पदाच्या रिक्त जागा भरण्याबाबतची प्रक्रिया राबविण्यात येत असून, रिक्त पदासाठी तक्रारदार हे पात्र असून, त्यांनी अर्ज भरला होता. दरम्यान, पदाचा निकाल जाहीर होऊन प्रदर्शित निवड यादीत तक्रारदार यांना प्रतीक्षा यादीत ठेवले होते. तक्रारदार महिलेला १ ऑक्टाेबर रोजी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, लातूर येथील भगवान बनसोडे याने औसा अंगणवाडीत मदतनीस म्हणून रिक्त पदावर नियुक्ती देणार आहेत, असे फोनद्वारे कळविले होते. या पदाच्या नियुक्तीच्या अनुषंगाने तक्रारदार महिलेने ४ ऑक्टाेबर रोजी शिपाई भगवान बनसोडे यांना समक्ष भेटले. याेवळी त्याने तक्रारदार महिलेला या रिक्त पदाचा नियुक्ती आदेश काढण्यासाठी म्हणून ८० हजारांच्या लाचेची मागणी केली होती.
याबाबत लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ९ ऑक्टाेंबर राेजी लेखी तक्रार दिली. प्रारंभी ५० हजार रुपये आणि उर्वरित ३० हजार कामावर रुजू झाल्यानंतर द्यायचे ठरले. या तक्रारीच्या पडताळणीनंतर बुधवारी पथकाने कार्यालयातच सापळा लाावला. यावेळी ५० हजारांची लाच स्विकारताना एसीबीच्या पथकाने शिपाई बनसाेडे याला पकडले. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.