लातूर : शाळांचा दर्जा वाढावा, भौतिक सुविधांबरोबर गुणवत्ताही वाढीस लागावी, यासाठी शासनाच्या वतीने ‘शाळा सिद्धी’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील २६३९ पैकी १७३६ शाळांनी सहभाग नोंदवीत आपले स्वयंमूल्यमापन पूर्ण केले आहे. ५०३ शाळांनी मात्र याकडे पाठच फिरविल्याचे दिसून येत आहे.शाळांची गुणवत्ता वाढावी, यासाठी गेल्या काही वर्षांपासून शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आता शाळा सिद्धी स्वयंमूल्यमापन हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत ७ क्षेत्र आणि ४६ मानकानुसार गुण देण्यात येणार आहेत. त्यात वर्ग निरीक्षण, शाळांच्या भौतिक सुविधा, शाळांचे गुणवत्ता, शिक्षक प्रशिक्षण, ग्रंथालय, विद्यार्थी संख्येच्या तुलनेत स्वच्छतागृह, रॅम्प अशा विविध बाबींचा समावेश करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातील शाळा सुधारण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे शासनाने जिल्हा परिषदेबरोबर नगर परिषद, महानगरपालिका व खासगी शैक्षणिक संस्थांनाही शाळा सिद्धी स्वयंमूल्यमापन करणे बंधनकारक केले आहे. तीन वर्षांत शाळा सिद्धीचे प्रमाणपत्र मिळविणे आवश्यक असून, हे प्रमाणपत्र पाच वर्षांच्या कालावधीसाठी राहणार आहे. जिल्ह्यात एकूण २ हजार ६३९ शाळा आहेत. त्यापैकी स्वयंमूल्यमापनासाठी १ हजार ७३६ शाळांनी नोंदणी करून ते स्वयंमूल्यमापन पूर्ण केले आहे. तसेच ४०० शाळांचे स्वयंमूल्यमापनाचे काम प्रगतिपथावर असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले. मात्र जिल्ह्यातील ५०३ शाळांनी या उपक्रमात सहभागच घेतला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मागास असलेल्या शाळांची प्रगती कशी होणार, असा सवाल पालकांतून केला जात आहे.
‘शाळा सिद्धी’कडे ५०३ शाळांची पाठ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2017 12:20 AM