औराद शहाजानी (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीसह परिसरास सोमवारी दुपारी ४ ते ५.३० वा. च्या सुमारास मुसळधार पावसाने झोडपले. दीड तासात तब्बल ६० मिमी पाऊस झाला. त्यामुळे सखल भागातील अनेक घरांत, दुकानांमध्ये पाणी घुसले. तसेच लातूर- जहिराबाद महामार्गावरील शेजारील कर्नाटक हद्दीतील जामखंडी येथील पर्यायी पूल वाहून गेला. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
औराद शहाजानी परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे लातूर- जहिराबाद महामार्गावरील पर्यायी पूल वाहून गेल्याने महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा या तीन राज्यांची वाहतूक बंद झाली. परिणामी, पर्यायी वाहतूक मुंबई- हैदराबाद महामार्गाकडे वळविण्यात आली आहे. औरादसह परिसरातील तगरखेडा, हालसी, माने जवळगाव, सावरी, बाेरसुरी आदी गावांतील ओढ्याच्या पुलावर पाणी आल्याने या भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. त्यामुळे काही नागरिक रस्त्यावर अडकून राहिले आहेत.
तेरणा नदी वाहू लागली...तेरणा नदी यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच वाहू लागली आहे. नदीवरील औराद, तगरखेडा येथील उच्चस्तरीय बंधाऱ्याची दोन- दोन दारे उघडून अतिरिक्त पाणी कर्नाटकात सोडून देण्यात आले आहे. मुसळधार पाऊस झाल्याने शेतातील पिकांची खरडण झाली असून पाण्यासोबत मातीही वाहून गेली आहे. गेल्या दहा दिवसांपासून सतत रिमझिम पाऊस होता. सोमवारी सूर्यदर्शन झाले. परंतु, सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. येथील महामार्ग शेजारील नाल्यांचे बांधकाम व्यवस्थित न झाल्याने महामार्गाचे पाणी शेजारील अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानांत, घरामध्ये घुसले आहे. तसेच महामार्ग शेजारील वसंतराव पाटील विद्यालय, महाराष्ट्र विद्यालयात मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्याचे दिसून आले.