- हरी मोकाशेलातूर : राज्यातील वैद्यकीय शिक्षकांनी सोमवारपासून रुग्णसेवेवर बहिष्कार टाकल्याने रुग्णसेवेवर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नियमित होणाऱ्या जवळपास ६० टक्के शस्त्रक्रिया थांबल्या आहेत. शस्त्रक्रियेसाठी आलेल्या रुग्णांना परत पाठविण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.
राज्यात वैद्यकीय शिक्षण खात्यांतर्गत एकूण २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये आहेत. तिथे जवळपास तीन हजार वैद्यकीय प्राध्यापक आहेत. तसेच अस्थायी वैद्यकीय शिक्षकांची संख्या जवळपास ६०० आहे. या वैद्यकीय शिक्षकांना पदवी व पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासह वैद्यकीय शिक्षण व रुग्णसेवा असे तिहेरी काम करावे लागते.
दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी प्राध्यापकांना सेवेत नियमित करून घेण्यात यावे व त्यांचे समावेशन करण्यात यावे, वैद्यकीय अध्यापकांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे सातव्या वेतन आयोगातही आश्वासित प्रगती योजना केंद्र व इतर राज्यांप्रमाणे लागू करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील वैद्यकीय शिक्षकांनी सोमवारपासून रुग्णसेवेवर बहिष्कार टाकला आहे, त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे.
बुधवारी तिसऱ्याही दिवशी हे आंदोलन सुरूच होते. या आंदोलनामुळे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दररोज होणाऱ्या जवळपास ३० शस्त्रक्रिया थांबल्या आहेत. मंगळवारी दिवसभरात अत्यावश्यक सेवेमधील केवळ २४ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. अशीच स्थिती राज्यातील अन्य वैद्यकीय महाविद्यालयात आहे.
निवासी डॉक्टरांवर अतिरिक्त ताण...एमएसएमटीएच्या आंदोलनामुळे येथील जवळपास ७० वैद्यकीय शिक्षकांनी रुग्णसेवेवर बहिष्कार टाकला आहे. येथे दररोज बाह्यरुग्ण विभागात १ हजार ३०० रुग्णांची नोंदणी होत असते. या रुग्णांची तपासणी करून औषधोपचार देण्याचा ताण निवासी डॉक्टर व पदव्युत्तरच्या डॉक्टरांवर पडला आहे.
आंदोलन मागे घेण्याचा निर्णय नाही...वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत सचिव, सहसंचालकांच्या समवेत बैठक झाली. त्यात शिक्षणमंत्र्यांनी मागण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका दर्शविली आहे. अस्थायी प्राध्यापकांचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. मात्र, यासंदर्भात लेखी आश्वासन देण्यात आले नाही, त्यामुळे अद्याप आंदोलन मागे घेण्यात आले नाही. सध्या राज्यात ६० टक्के शस्त्रक्रिया थांबल्या आहेत.- डॉ. उदय मोहिते, राज्याध्यक्ष, एमएसएमटीए.