लातूर : जिल्ह्यात रस्ता, पीकविमा व मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी सुनेगाव-शेंद्री, तळेगाव (बोरी) आणि गोटेवाडी या तीन गावांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला, तर आनंदवाडी, पिरू पटेलवाडी, रामघाट तांडा येथील मतदान केंद्रांकडे दुपारपर्यंत कोणीही फिरकले नव्हते. जिल्ह्यात प्राथमिक अंदाजानुसार सरासरी ६२.१५ टक्के मतदान झाले.
अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव-शेंद्री या गावाला रस्ता नसल्याने पावसाळ्यात प्रचंड हाल होतात. पाच किलोमीटरच्या मार्गासाठी १४ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. दरम्यान, रस्त्याच्या मागणीसाठी ५५५ मतदार असलेल्या सुनेगाव केंद्रावर एकानेही मतदान केले नाही. तर औसा तालुक्यातील गोटेवाडी येथील ग्रामस्थांनीही पाणी व रस्त्याच्या मागणीसाठी बहिष्कार टाकला. एकूण २२२ मतदारांपैकी १७ जणांनी मतदान केले. तर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील तळेगाव बोरी येथे एकूण मतदारांची संख्या १५०५ असून, त्यातील केवळ ५ जणांनी मतदान केले. सदर गावाला पीकविमा, रस्ता व दुष्काळाच्या उपाययोजना नाहीत.
तीन गावांमध्ये बहुसंख्य जणांचा बहिष्कार अखेरपर्यंत राहिला. चाकूर तालुक्यातील आनंदवाडी, पिरु पटेलवाडी, रामघाट तांडा येथे आश्वासन मिळाल्याने दुपारनंतर बहिष्कार मागे घेण्यात आला. दरम्यान, आनंदवाडी येथे मतदान संपण्याला काही अवधी असताना केंद्रात सहा पूर्वी दाखल झालेल्या मतदारांचे रात्री ११पर्यंत मतदान चालले. एकुण ७५३ मतदारांनी हक्क बजावला.
मतदान शांततेतलातूर लोकसभा मतदारसंघात ६२.१५ टक्के मतदान झाले असून, अंतिम आकडेवारी रात्री उशिरा हाती येईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली. कुठेही मतदान यंत्र बिघाडाचे वृत्त नसून, सर्वत्र शांततेत व सुरळीत मतदान पार पडले.