आशपाक पठाण/ लातूर
औसा : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जिल्हास्तरीय इज्तेमात मंगळवारी सायंकाळी ६५ जोडप्यांचा विवाह झाला. यावेळी लाखो समाजबांधवांनी नवविवाहितांना प्रार्थनेतून आशीर्वाद दिला. इस्लामने विवाहाची पद्धत अतिशय साधारण सांगितली आहे, त्याचे आचरण करा, असा उपदेश देण्यात आला.
निजामुद्दीन मर्कज दिल्लीचे मौलाना फारूखसाब म्हणाले, जेव्हा मनुष्य गुन्हा (पाप)करतो, तेव्हा ईश्वराची मदत बंद होते. त्यामुळे गुन्हेगारी आयुष्य जगू नका, ईश्वराने पवित्र ग्रंथात जो मार्ग दाखवला, त्याचे अवलंब करा. तरुणांनी धर्मगुरुच्या सतमार्गाचे अवलोकन करून जीवन यशस्वी करावे. तुमचे जीवन सुखद, समस्यामुक्त करायचे असेल तर ईश्वराच्या प्रार्थनेत मग्न व्हा, तुम्हाला रोजागारासह मान, सन्मान मिळेल. दानधर्म करा; पण ते दान दिल्याचा गर्व नसावा. ईश्वराने तुम्हाला दिले, तुम्हीही गरजूंना द्या, असा उपदेश मौलाना फारूखसाब यांनी दिला. मुफ्ती अस्लमसाब बीडवाले म्हणाले, तुमचे अंतकरण शुद्ध ठेवा. आपल्यामुळे कोणाची फसवणूक, नुकसान होईल, असे काम करू नका. इस्लाम धर्माची शिकवण अतिशय सोपी आहे. त्यानुसार आपले आचरण, वर्तन ठेवा. आपले सर्वोत्तम कार्य नमाज असून, यासाठी अधिक वेळ द्यावा.
विवाहातील खर्च टाळायला हवेत...
मुफ्ती फुर्खान साब यांनी विवाह पठण केले. विवाह सोहळा साध्या पद्धतीने करणे हे सुन्नत (पुण्य) आहे. वायफळ खर्च करून केलेल्या विवाहाला शून्य महत्त्व आहे. पैगंबरांनीही साधारण व अखर्चित विवाहाला पसंती दिली. आजच्या युगात लग्न मुलीच्या वडिलांकरिता न झेपणारे ओझे झाले. समाजात बहुतांश जण आपली हौस मुलीच्या वडिलांकडून पूर्ण करून घेतात. हे चुकीचे असून, यामुळे नवीन प्रथा पुढे येत आहे. ती कुठेतरी थांबायला हवी, असा उपदेश दिला.
हिंदू बांधवांनीही दिल्या शुभेच्छा...
इज्तेमाचा मंगळवारी समारोप असल्याने सर्वधर्मीय व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवली होती. इज्तेमासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या समाजबांधवांना ठिकठिकाणी हिंदू बांधवांनी चहा, पाणी केले. त्याचबरोबर भाजपचे आ. अभिमन्यू पवार यांनी इज्तेमास्थळी येऊन मुस्लिम समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"