देवणी (जि़ लातूर) : तालुक्यातील तळेगाव (भोगेश्वर) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील तीन कर्मचाऱ्यांनी जवळपास ६४ लाख ८९ हजारांची अफरातफर केल्याचे बँक तपासणीअंती निदर्शनास आले. याप्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध आर्थिक फसवणूक व अफरातफरीचा बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवणी पोलिसांनी सांगितले, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तळेगाव (भोगेश्वर) (ता़ देवणी) येथील शाखेत १ आॅक्टोबर २०१५ ते १५ जानेवारी २०२० या चार वर्षांच्या कालावधीत सतीश यशवंतराव गायकवाड (रा. उदयगिरी कॉलनी, उदगीर), महादेव वैजनाथ नाबदे आणि विनायक व्यंकट गायकवाड हे तिघे कर्मचारी म्हणून कार्यरत होते़ या तिघांनी संगनमत करुन बँकेतील ठेवीदार, खातेदारांकडून प्राप्त झालेली रक्कम, शिवाय वेळोवेळी जमा झालेली रक्कम ही खातेदारांच्या, बँकेच्या खात्यावर जमा न करता स्वत:च्या फायद्यासाठी वापरली. बँकेचे ठेवीदार, खातेदार आणि बँकेचा विश्वासघात करुन ६४ लाख ८९ हजार ४४९ रुपयांची फसवणूक करीत अफरातफर केली.बँकेतील व्यवहाराची तपासणी करण्यात आली असता त्यात अफरातफर झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक राजेंद्र जगताप यांच्या फिर्यादीवरुन देवणी पोलीस ठाण्यात कलम ४०९, ४२०, ४७७ अ, ३४ भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरण आर्थिक गुन्हा शाखेकडे...आर्थिक गुन्ह्यातील रक्कम ही अधिक असल्याने सदर गुन्ह्याच्या तपास हा देवणी ठाण्यातून लातूरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे गुरुवारी वर्ग करण्यात आला असल्याचे देवणी पोलिसांनी सांगितले.