किल्लारी (लातूर) : किल्लारीस तालुक्याचा दर्जा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी सकाळी लातूर- उमरगा महामार्गावरील किल्लारी पाटी येथे ६७ गावांतील नागरिकांनी दोन तास रस्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे वाहतूक ठप्प होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दोन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
१९९३ च्या भूकंपानंतर तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांनी किल्लारीस तालुक्याचा दर्जा देऊ, असे आश्वासन दिले होते. तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनाही तत्कालिन सरपंच डॉ. शंकरराव परसाळगे यांच्या शिष्टमंडळाने प्रस्ताव दिला होता. तद्नंतर निवृत्ती भोसले गुरुजी, त्रिंबकराव पाटील, निवृत्ती भोसले काटेकर यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन तालुक्याच्या नकाशासह प्रस्तावही दिला होता. तेव्हाही तालुका निर्मितीचे आश्वासन देण्यात आले होते. पुन्हा तत्कालिन सरपंच शंकरराव परसाळगे, प्रभारी सरपंच युवराज गायकवाड यांनीही वारंवार निवेदने देण्याबरोबर आंदोलने केली. परंतु, सरकारने दुर्लक्षच केले.
किल्लारी तालुका न झाल्यास आम्ही जिवाची पर्वा करणार नाही, असा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विनायकराव पाटील यांनी दिला. आंदोलनात अमर बिराजदार, माजी उपसभापती किशोर जाधव, माजी जि.प. सदस्य प्रकाश पाटील, विनायकराव पाटील, महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष संतोष सोमंवशी, विजयकुमार सोनवणे, सुभाष पवार, बंकटराव पाटील, गोविंद भोसले, गुंडप्पाआण्णा बिराजदार, रिपाइंचे हरिश डावरे यांनी मनोगत व्यक्त केले.
तालुका निर्मितीचा हा लढा किल्लारीपुरता मर्यादित नसून ६७ गावांचा आहे. परिसरातील गावांची ओळख किल्लारी म्हणून आहे, असे भूकंपग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष अमर बिराजदार यांनी सांगितले. सुभेदार म्हणाले, तालुका होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. माजी जि.प. सदस्य प्रकाश पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेच्या सभागृहात यासंदर्भात ठराव मांडला होता. तो शासनाने पाठविण्यात आला. परंतु, प्रलंबित राहिला आहे. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. यावेळी महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष संतोष सोमवंशी यांनी किल्लारी तालुका झालाच पाहिजे, अशी मागणी केली. कवठ्याचे विजयकुमार सोनवणे यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला.
आगामी निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा...बुधवारी किल्लारी ग्रामपंचायतपासून ते किल्लारी पाटीपर्यंत मोर्चा काढण्यात आला. किल्लारी तालुका जाहीर करा, हम सब एक है, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देण्यात आल्या. तालुका निर्मितीचा प्रस्ताव ३० वर्षांपासून मंत्रालयात प्रलंबित का ठेवण्यात आला आहे, असा सवाल करीत तालुकानिर्मिती न झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीवेळी ६७ गावांचा मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
शासनाकडे तात्काळ प्रस्ताव पाठवू...जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी संतोष सोमवंशी यांच्या भ्रमणध्वनीवरुन आंदोलकांशी चर्चा केली. तुमचा प्रस्ताव तात्काळ शासनाकडे पाठवून देण्यात येईल, असे सांगितले. तेव्हा उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांना निवदेन देण्यात आले. यावेळी तहसीलदार भरत सूर्यवंशी, नायब तहसीलदार दत्ता कांबळे, तलाठी आशा हळनूर, विजयकुमार उस्तुरे, वाडेकर, व्यंकटेश बिराजदार, डीवायएसपी मधुकर पवार, सपोनि सुनील गायकवाड आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गोविंद भोसले यांनी केले.