यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे म्हणाले, पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी अनेक गावातील शेतकरी विविध प्रयोग करतात. त्यामुळे उत्पादकतेत वाढ होते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांचा गौरव व्हावा. त्यामुळे त्यांचे आणखीन मनोबल वाढते व नव्या उमेदीने ते नवनवीन तंत्रज्ञानाने पिके घेतात. तसेच इतर शेतकऱ्यांना त्यांचे मार्गदर्शन होते, म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेण्यात येत आहे. त्यासाठी मंडल कृषी अधिकारी (प्र.) रणजित राठोड प्रयत्नशील आहेत.
निलंगा तालुक्यातून एकूण ६९ शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. यात ५७ शेतकरी हे हरभरा पिकासाठी, तर १२ शेतकरी हे ज्वारी पिकासाठीच्या स्पर्धेत उतरले आहेत. जे शेतकरी या स्पर्धेत विजेते ठरतील, त्यांना शासनामार्फत बक्षीस देण्यात येणार आहे. हे शेतकरी तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत, असे मंडल कृषी अधिकारी रणजित राठोड यांनी सांगितले.
पीक कापणीसाठी गाव पातळीवर पीक कापणी समिती असणार असून, यामध्ये पर्यवेक्षण अधिकारी (अध्यक्ष), कृषी सहायक (सदस्य सचिव), लाभार्थी शेतकरी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रगतशील शेतकरी, पोलीसपाटील, तलाठी, ग्रामसेवक हे सदस्य असतील. गाव पातळीवर पहिले बक्षीस पाच हजार, दुसरे तीन हजार, तिसरे बक्षीस दोन हजार रुपये देण्यात येणार आहे.