लातूर : कळंब येथील एका व्यापाऱ्याला नोटा बदलून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या सराईत सात आराेपींना लातूर पाेलिसांनी अटक केली असून, दाेघे जण फरार झाले आहेत. आराेपींना लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे. ही कारवाई विवेकानंद आणि एमआयडीसी ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे केली.
पाेलिसांनी सांगितले, ८ जुलै राेजी सायंकाळी विवेकानंद चौक ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांना खबऱ्याने माहिती दिली. या माहितीच्या आधारे पाेलिसांनी एमआयडीसी परिसरात सापळा लावला. पाच नंबर चौकात एक वाहन थांबवून झडती घेतली. त्यात ९६ लाखांची रक्कम आढळली. याबाबत गाडीचालक अजिंक्य देवडा (रा. कळंब) यांच्याकडे चाैकशी केली असता, त्यांना काहींनी लातुरात बोलावून घेतले हाेते. दरम्यान, ९६ लाखांच्या माेबदल्यात दाेन हजारांच्या एक कोटींच्या नोटा बदलून देतो असे सांगून आमिष दाखविल्याचे सांगितले.
अधिक विचारपूस केली असता, त्यांच्याकडे दोन हजारांच्या कोणत्याही नोटा नसल्याचे समोर आले. यातून व्यापाऱ्याची फसवणूक करण्याच्या उद्देशाने कळंबमधून लातूरला बोलावल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बालाजी एकनाथ कोयले (३८, रा. लातूर), किशोर आत्माराम माने (३२, रा. चाडगाव ता. रेणापूर), मेघश्याम शिवाजी पांचाळ (३५, रा. चव्हाणवाडी, ता. गेवराई जि. बीड), बालाजी लिंबाजीराव रसाळकर (४५, रा. विजापूर नाका, सोलापूर), श्याम प्रल्हाद घेगरदरे (६२, रा. विजापूर रोड सोलापूर), इमाम अहमद शेख (४०, रा. भोकरंबा, ता. रेणापूर), संदीप जयंत शिवणीकर (३७, रा. होडगी रोड, सोलापूर) यांना अटक केली.
याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अटकेतील आराेपींना लातूर न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली, अशी माहिती पाेलिसांनी दिली.