लातूर: तालुक्यातील भिसे वाघोली शिवारात जवळपास २० शेतकऱ्यांचा ७० एकर ऊस जळाल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जळालेला ऊस तातडीने तोडणी करून गाळपास न्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
भिसे वाघोली येथील शेतकरी सद्दाम गबरू पटेल, हकीम गबरू पटेल, शमसोद्दीन मैनोद्दीन सय्यद, शमियोद्दीन खैरात सय्यद, रईसोद्दीन खैरात सय्यद, फक्रोद्दीन खाजामियाँ सय्यद, रसूल दस्तगीर सय्यद, नबी दस्तगीर सय्यद, रियाज पाशामियाँ सय्यद यांच्यासह २० शेतकऱ्यांचा रविवारी दुपारी १ वाजण्याच्या अचानक ऊस पेटला. यावेळी ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचे लोळ मोठे असल्याने शेतकरीही हतबल झाले. घटनास्थळी मुरुड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ढाेणे, स्वाभिमानी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल, तलाठी आचार्य, यांच्यासह पोलीस, महसूल व मांजरा परिवारातील साखर कारखान्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच लागलीच ऊसतोडणीलाही प्रारंभ झाला.
अग्निशामन दलाकडून प्रयत्न...
वाघोली येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संभाजी वायाळ यांनी मांजरा विकास कारखान्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून याची तात्काळ कल्पना दिली. त्यानंतर काही वेळातच मांजरा परिवारातील विकास कारखान्याची अग्निशामक दलाची गाडी तात्काळ हजर झाली. माजी मंत्री दिलीपराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनाही घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी लागलीच ऊसतोडणीचे आदेश देऊन वाहनेही पाठवून दिली.