लातूर जिल्ह्यात ५ लाख ४३ हजार ५०८ विविध संवर्गांतील वाहने आहेत. त्यात सर्वाधिक ४ लाख ४ हजार ८८८ दुचाकींचा समावेश आहे. त्यानंतर मोटार कार, जीप, टॅक्सी आदी चारचाकी वाहनांची संख्या जवळपास ६० हजारांच्या घरात आहे. याशिवाय, ऑटोरिक्षांची संख्याही २० हजारांहून अधिक आहे. अनेक वाहनधारक केवळ नोंदणी करीत असतानाच विमा काढतात. एकदा का मुदत संपली की, अनेकजण विमा भरण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे. वाहन कोणतेही असो अपघात झाल्यास त्यात होणारे नुकसान भरून काढण्यासाठी विमा कंपनी हा खूप मोठा आधार आहे; परंतु केवळ टॅक्सी, परवानाधारक ऑटोरिक्षा, अवजड वाहतूक करणारे ट्रक, टेम्पो, प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स हेच वाहनधारक विमा काढण्यासाठी तत्पर आहेत. सर्वाधिक वापरात असलेल्या दुचाकींचा विमा एकदा संपला की, पुन्हा काढला जात नसल्याचे समोर आले आहे. ग्रामीण भागातील १०० पैकी जवळपास २५ ते ३० दुचाकी विम्याविना धावत असल्याचे आढळून आले आहे.
विमा हा वाहनांसोबतच स्वत:च्या सुरक्षेसाठीही महत्त्वाचा घटक असतानाही याकडे होणारे दुर्लक्ष धोकादायक आहे.
एकंदरित, रस्त्यावर विम्याशिवाय किती वाहने धावतात, याबाबतची अधिकृत नोंद प्रादेशिक परिवहन विभागाकडे नसते. मात्र, वाहतूक पोलीस, परिवहन विभागाच्या पथकाकडून रस्त्यावर वाहनांची तपासणी केली जाते. अशावेळी बहुतांश दुचाकी, ट्रॅक्टर तसेच खाजगी वापरात असलेल्या अनेक चारचाकी वाहनधारकांकडेही विमा काढण्यात आला नसल्याचे आढळून आले आहे. विमा हा अपघातात सर्वाधिक आर्थिक बळ देणारा घटक आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे स्वत:चेच नुकसान करून घेण्यासारखे आहे. त्यामुळे स्वत:बरोबर इतरांच्या सुरक्षेसाठीही रस्ते अपघातात विमा महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात आले.
परवानाधारक वाहने दरवर्षी फिटनेस तसेच अन्य कामांसाठी येतात. त्यांच्याकडे विमा असल्याशिवाय नोंदणीच होत नाही. वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा घटक असलेल्या विम्याकडे दुर्लक्ष करू नये. - विजय पाटील,
उपप्रादेशिक परिवहन
अधिकारी, लातूर