लातूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांना मोफत शिक्षण मिळावे म्हणून राज्य शासनाच्या वतीने आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. आतापर्यंतच्या तीन फेऱ्याअंतर्गत लॉटरी पद्धतीने १ हजार ३९९ मुलांचा प्रवेश झाला आहे. दरम्यान, राज्यस्तरावरून निघालेली चौथी लाॅटरी ७४ बालकांना लागली आहे. त्याचा किती जण लाभ घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार राज्यात दरवर्षी २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येते. याअंतर्गत जिल्ह्यातील २०० शाळांनी शिक्षण विभागाकडे नोंदणी केली होती. त्यानंतर राज्यस्तरावर निघालेल्या पहिल्या ऑनलाइन सोडतीत १ हजार ६४८ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यातील १ हजार ३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यानंतरच्या दुसऱ्या फेरीत २७९ विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला होता. तिसऱ्या फेरीत ८२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.
दरम्यान, राज्यातील विविध शाळांतील काही जागा रिक्त राहिल्याने पुन्हा चौथी लाॅटरी बुधवारी काढण्यात आली आहे. ती जिल्ह्यातील ७४ मुलांना लागली असून, पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यावा म्हणून संदेशही पाठविण्यात आले आहेत. प्रवेशाची अंतिम मुदत ही २८ जुलैपर्यंत आहे. दरम्यान, तिसऱ्या फेरीअखेरपर्यंत एकूण १ हजार ३९९ मुलांचा प्रवेश निश्चित झाला आहे.
अपेक्षित शाळा न मिळाल्याने काहींनी नाकारला प्रवेश...आरटीईअंतर्गत जिल्ह्यात एकूण २०० शाळांचा समावेश आहे. त्यातील १ हजार ६४८ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दरम्यान, काही विद्यार्थ्यांचा अपेक्षित शाळेत नंबर लागला नाही. तसेच शाळा घरापासून दूर असल्याने काही पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे प्रवेशाच्या तीन फेऱ्या झाल्या आहेत. आता चौथ्या फेरीसाठी ऑनलाइन लॉटरी निघाली आहे.
पाल्यांचा प्रवेश निश्चित करावा...जिल्ह्यातील १ हजार ६४८ जागांपैकी आतापर्यंत एकूण १ हजार ३९९ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला आहे. काही जागा उर्वरित राहिल्या आहेत. त्यामुळे चौथी लॉटरी काढण्यात आली आहे. त्यात ७४ मुलांचा समावेश आहे. या मुलांचा पालकांनी प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
लातुरातील ८०२ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश...लातूर - ८०२अहमदपूर - ७३औसा - ७३चाकूर - ५२देवणी - ४१जळकोट - ०७निलंगा - १३८रेणापूर - २३शिरुर अनंतपाळ - ९उदगीर - १८१